जयपूर, कानपूर, भोपाळ, इंदूर आदी शहरांत चालू होणार कॅम्पस !
लंडन (इंग्लंड) – ब्रिटन उच्चशिक्षण देण्यासाठी पुढील ५ वर्षांत भारतीय महानगरांसह ‘टियर-२’ (५० सहस्र ते १ लाख लोकसंख्या असलेल्या) शहरांत त्याचे कॅम्पस चालू करणार आहे. २४ ब्रिटीश विद्यापिठांचा यात समावेश असून साउदम्पटन विद्यापीठ सर्वांत आधी त्याची शाखा भारतात उघडेल. या विद्यापिठांमध्ये जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापिठे यांचाही समावेश आहे. देशातील जयपूर, कानपूर, भोपाळ, इंदूर, पाटलीपुत्र आदी शहरांची निवड यासाठी करण्यात आली आहे. यासाठी केंद्रशासनाने गेल्या आठवड्यातच अनुमती दिली.
ऑक्सफर्ड, केंब्रिज आणि मँचेस्टर विद्यापिठे ‘आयआयटी’समवेत संयुक्त संशोधन करणार असल्याचीही माहिती आहे. मँचेस्टर विद्यापिठाचे उपाध्यक्ष फ्लिंट यांच्या मते, ब्रिटनची ‘नॅशनल ग्रेफाइन इन्स्टिट्यूट’ ही ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगेलोर’समवेत सेमीकंडक्टरवर संशोधन करेल.
भारतीय विद्यार्थ्यांना अनुमाने अर्ध्या खर्चात उच्चशिक्षण घेता येणार !
भारतात उघडल्या जाणार्या विद्यापिठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना अनुमाने अर्ध्या खर्चात पदवी मिळू शकणार आहे. सध्या एका वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना २५ ते ३० लाख भारतीय रुपये द्यावे लागतात. भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क अनुमाने १५ लाख रुपये असेल. ही रक्कम भारतातील कोणत्याही खासगी विद्यापिठाच्या शुल्काएवढीच आहे. पहिल्या वर्षांत १० सहस्र भारतीय विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती साउदम्पटन विद्यापिठाच्या प्रवक्त्याने दिली.
संपादकीय भूमिकापूर्वी जगभरातील विद्यार्थी नालंदा आणि तक्षशिला या विद्यापिठांमध्ये शिकण्यासाठी येत असत. भारत स्वतंत्र होऊन ७७ वर्षे होऊनही दर्जेदार शिक्षणासाठी विदेशी विद्यापिठांना भारतात पायघड्या घालाव्या लागतात, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश आहे ! |