सर्वाेच्च न्यायालयाने आदेश देऊन ४ वर्षे उलटली !
मुंबई – मुंबईत एकूण २६३ गोठे असून सर्वाधिक गोठे गोरेगाव परिसरात आहेत. न्यायालयाने निर्णय देऊनही मुंबईतील गायी–म्हशींचे गोठे, मुंबईबाहेर स्थलांतरित करण्यास दूध उत्पादकांच्या संघटनेने विरोध केला आहे. पालघरमधील दापचरी येथे गोठे स्थलांतरित केल्यास मुंबईत प्रतिदिन ताजे दूध वितरीत करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आरे वसाहतीतच गोठ्यांना जागा द्यावी, उपनगरातील गोठ्यांमधील १० सहस्र जनावरे आरे दुग्ध वसाहतीत सामावून घ्यावीत, अशी मागणी दूध उत्पादक संघटनेने केली आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनाने आता राज्य सरकारच्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाला पत्र पाठवले आहे.
मुंबईतील गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभागाने वर्ष २००५ मध्ये घेतला होता. मुंबई दूध उत्पादक संघटनेने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तेथेही संघटनेच्या विरोधात निकाल लागला. निकाल येऊन ४ वर्षे झाली, तरी गोठे अजूनही मुंबईतच आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभागाने पालिकेकडे साहाय्य मागितले होते. पालिकेने गोठ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. केवळ आरे वसाहतीतील गोठे हटवण्यात येणार नाहीत, असे अधिकार्यांनी सांगितले आहे. गायी रस्त्यावरून फिरत असल्याने वाहतूककाेंडी होणे आदी त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.