‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत, वय ९१ वर्षे) पुणे येथे रहात असतांना साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. सध्या पू. दातेआजी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असून त्या रुग्णाईत आहेत.
१. कुटुंबप्रमुखाचे दायित्व निभावणे
‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत, वय ९१ वर्षे) दाते कुटुंबाच्या कुटुंबप्रमुख आहेत. त्या पुणे येथे रहात असतांना त्यांची दोन्ही मुले (डॉ. नरेंद्र दाते, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६५ वर्षे आणि श्री. निरंजन दाते) आणि स्नुषा (सौ. ज्योती नरेंद्र दाते, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे आणि सौ. नेहा निरंजन दाते) अध्यात्मप्रचाराची सेवा करण्यासाठी जात असत. त्यांच्या घरी सत्संग असे. घरातील सर्वच व्यक्ती अत्यंत व्यस्त असत. पू. आजींना घरात प्रत्येक वस्तू कुठे आहे आणि किती प्रमाणात आहे, असे सर्वच ठाऊक असे. त्या सतत कार्यरत असत.
२. पू. दातेआजींचा वात्सल्यभाव आणि सहजतेने वागणे
त्यांच्या घरी साधकांची सतत ये-जा असे. साधक पू. आजींच्या घरी कधीही जात असत. पू. आजी साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांची प्रेमाने विचारपूस करत असत. त्या घरी आलेल्या साधकाला खाऊ देऊनच पाठवत असत. पू. आजींची आत्मीयता आणि प्रीती प्रत्यक्ष अनुभवलेले आम्ही साधक भाग्यवान आहोत. पू. आजींचे वागणे कृत्रिम किंवा चाैकटबद्ध नाही. त्यांच्या वागण्यात सहजता आहे.
‘कुटुंबातील व्यक्तींना स्वभावदोषांसह स्वीकारणे, ही साधना आहे’, हे आपल्याला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ठाऊक असूनही कठीण जाते; मात्र पू. आजी आम्हा सर्व साधकांना त्यांच्या स्वभावदोषांसह सहजतेने स्वीकारून गुरुदेवांचे कार्य तळमळीने आणि कृतज्ञताभावाने करत असत.
३. सेवाभाव
अ. साधक बहुधा पू. आजींना सेवेसंदर्भातील निरोप तोंडीच देत असत. पू. आजी साधकांनी दिलेला निरोप आठवणीने जशाच्या तसा डॉ. दाते आणि सौ. दाते यांना देत असत.
आ. त्यांच्या घरी पुणे जिल्ह्यातील ‘सनातन प्रभात’ नियतकालकांचे गठ्ठे, पाकिटे आणि पार्सल नियमित येत असत. पू. आजी ते व्यवस्थित ठेवत असत आणि तत्परतेने त्यांचा पाठपुरावा करून ते हस्तांतरित करत असत.
इ. अखंड सेवारत, कार्यरत, उत्साही आणि प्रीतीस्वरूप अशा पू. आजींमुळे आम्हा साधकांमध्ये साधनेची ओढ निर्माण झाली.
‘हे गुरुदेवा, पू. दातेआजी यांच्याप्रमाणेच आम्हा साधकांच्या अंतरी कृतज्ञताभाव आणि प्रीती वाढू दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. अनुराधा निकम (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६५ वर्षे), फोंडा, गोवा. (९.७.२०२४)