गणेशोत्सव विशेष…
‘समस्त हिदूंचे आराध्य दैवत श्री गणेश ! दुःखाचे हरण करणारा आणि सर्वांना सौख्य देणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव ! ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात श्री गणेशमूर्तीचे वाजत गाजत आगमन होते, तर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, या आर्तभावाने त्याला निरोप दिला जातो. ही रित काही गेली १२५ वर्षे पालटलेली नाही; परंतु सध्याच्या काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये भक्तीभाव वाढण्यापेक्षा ‘या उत्सवात काही तरी वेगळे करावे’, असे वाटून वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकाराच्या मूर्ती सिद्ध केल्या जातात.
अकोला येथील एका मंडळाने स्टीलचे ताट, वाट्या, ग्लास, चमचे, कोपर, पळी यांच्यापासून श्री गणेशमूर्ती साकारली आहे. गेल्या ५५ वर्षांपासून हे मंडळ म्हणे आगळ्यावेगळ्या श्री गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी त्यांनी नोटा, गुलाब, पेन्सिल, रुद्राक्ष, कापूस, केळी, नाणी यांपासून मूर्ती बनवल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एका मंडळाने १२५ किलो बडीशेपचा वापर करून १२ फूट उंच श्री गणेशमूर्तीं साकारली आहे. यासाठी त्यांना ५० सहस्र रुपये व्यय आला. मिरज येथील एका मंडळाने महाराष्ट्रात क्रमांकाने पहिली, तर भारतातील दुसर्या क्रमांकाची २३ फूट उंच आणि ७०० किलो वजनाची फायबरपासून सिद्ध केलेली श्री गणेशमूर्तीं साकारली आहे. ‘ही मूर्तीं ३० वर्षे टिकणार’, असे मंडळाचे मत आहे. मुंबई येथील एका प्रसिद्ध मंडळाने श्री विष्णूचा १०वा अवतार असलेल्या कल्की रूपातील ४७ फूट उंच श्री गणेशमूर्तीं साकारली आहे. प्रतिवर्षी मूर्तींच्या उंचीत काही फुटांची वाढ केली जात आहे. ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये या मंडळाची नोंद झालेली आहे.
या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांची श्री गणेशाप्रती काही ना काही श्रद्धा असू शकते; मात्र दुर्दैवाने धर्मशिक्षणाच्या अभावी त्यांना ‘अशा वस्तूंपासून किंवा विविध रूपांतील मूर्तीं सिद्ध करू नये’, हे कुणी सांगितलेच नाही. अध्यात्मशास्त्रानुसार देवतेच्या नावासह शब्द, रूप, रस, गंध, शक्ती हे एकत्र असल्यामुळे त्या त्या देवतेची स्पंदने तिथे येतात. त्यामुळे देवतेचे रूप धर्मशास्त्रानुसारच असायला हवे. श्री गणेशाची मूर्तीं जर मूर्तींशास्त्रानुसार योग्य आकारातील, म्हणजेच प्रत्यक्ष श्री गणेशाच्या रूपाप्रमाणे असेल, तर त्याचा भाविकांना लाभ होतो. ‘श्री गणेशमूर्तीं ही शाडूमातीची असणे’, हेच धर्मशास्त्रानुसार योग्य आहे. उत्सव हे केवळ मनोरंजन आणि कला यांच्या प्रदर्शनासाठी नसून प्राधान्याने देवाची उपासना करून चैतन्य मिळवण्यासाठी असतात. या कालावधीत श्री गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ करून घेण्यासाठी मूर्तींतून देवतेचे तत्त्व कार्यरत होणे अपेक्षित असते. त्यासाठी मूर्ती शास्त्रानुसार हवी. धर्माविषयीच्या अज्ञानामुळे ‘आपण यंदा काहीतरी नवीन करून दाखवले’, असे कार्यकर्र्त्यांना वाटत असते; पण ते टाळले पाहिजे.
– श्री. नीलेश पाटील, जळगाव