कुळे, १५ सप्टेंबर (वार्ता.) – केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागाचा मसुदा सिद्ध केला असून यामध्ये कुळे भागातील सर्व गावांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे यामध्ये धारबांदोडा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय हवामान पालट खात्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी कुळे-शिगाव पंचायतीच्या १५ सप्टेंबर या दिवशी बोलावण्यात आलेल्या खास ग्रामसभेत कुळे-शिगाव परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागातून वगळण्याची मागणी करणारा ठराव एकमताने घेण्यात आला.
या ग्रामसभेला सरपंच गोविंद शिगावकर, उपसरपंच नेहा मडकईकर आदींची उपस्थिती होती. ग्रामस्थांच्या मते कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रात अनेक खाणी आहेत आणि या खाणींवर या परिसरातील अनेक लोक काम करत आहेत, तसेच अनेक लोकांनी कर्ज काढून ट्रक घेतलेले आहेत. कुळे-शिगाव परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभाग झाल्यास या भागातील लोकांवर संकट ओढवणार आहे. मोले पंचायतीने घेतलेल्या खास ग्रामसभेतही पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागाला कडाडून विरोध करण्यात आला. मोले गाव पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागातून वगळण्याची मागणी करणारे निवेदन पंचायत पाठवणार असल्याची माहिती सरपंच वामन गावकर यांनी दिली आहे.