जयंती नाल्याचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत !

कोल्हापूर महापालिका प्रशासन, प्रदूषण मंडळ, कथित सामाजिक-पुरोगामी संघटना यांची डोळेझाक !

पंचगंगा नदी

कोल्हापूर, १३ सप्टेंबर (वार्ता.) – एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, असे सांगत आणि पंचगंगा नदी प्रदूषित होऊ नये, असा कांगावा करत महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन १२ सप्टेंबरला भाविकांना पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास नकार देत होते. दुसरीकडे १३ सप्टेंबरला जयंती नाल्याचे (जी पूर्वी नदी म्हणून ओळखली जात असे) पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. महापालिकेच्या बंधार्‍यावरून अतिशय काळेकुट्ट आणि कचरा, घाण असलेले पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. यामुळे भाविक आणि श्री गणेशभक्त यांनी संताप व्यक्त केला असून ‘कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे नाटक बंद करावे’, अशी संतप्त प्रतिक्रिया भक्तांकडून व्यक्त केली जात आहे.