|
पंढरपूर – संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी हिंदु धर्म आणि देवता यांची निंदा नालस्ती केली. व्यासपिठावर बसून त्यांच्या या पापाला मूकसंमती देणारे शरद पवार यांचा राष्ट्रीय वारकरी परिषद जाहीर निषेध करत आहे, असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, वारकरी संप्रदायात वर्षानुवर्षे ‘रामकृष्णहरि’ असा जयघोष केला जातो. राम आणि कृष्ण ही एकाच हरिची २ रूपे आहेत. प्रभु श्रीरामावर टीका करून महाराव यांनी समस्त वारकर्यांच्या श्रद्धेवर घाला घातला आहे. मेणाहून मऊ वारकरी संप्रदाय वेळ पडल्यास कठीण वज्रालाही भेदू शकतो. नाठाळाच्या माथी काठी हाणण्याची शिकवण आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांनी दिली आहे. त्यामुळे ज्ञानेश महाराव, संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार यांनी समस्त वारकर्यांची जाहीर क्षमायाचना करावी, अन्यथा वारकरी संप्रदाय या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यायालयीन लढा उभारील, तसेच संबंधित राजकीय व्यक्ती, पक्ष आदी सर्वांवर राजकीय बहिष्कार घालण्याचा निर्णय घेईल.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, शरद पवार मुख्यमंत्री असतांना त्यांनी श्री विठ्ठलाची पूजा केली नव्हती. त्याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले की, ‘पूजा करायची नव्हती, तर पंढरपूरला कशाला आलात ?’ तेव्हा ‘कार्यकर्त्यांना भेटायला आलो’, असे उत्तर त्यांनी दिले. आता त्यांचे देवदर्शन म्हणजे ढोंगीपणा आहे; म्हणून आम्हाला लेखी क्षमायाचना अपेक्षित आहे.