रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. क्षिप्रा देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ७० वर्षे) यांचा भाद्रपद शुक्ल नवमी (१२.९.२०२४) या दिवशी ७० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या साधनेविषयी त्यांचा मुलगा श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे) याला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
सौ. क्षिप्रा देशमुख ७० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. रुग्णाईत असूनही सवलत न घेता व्यष्टी साधना आणि सेवा पूर्ण करणे
‘माझ्या आईला हृदयविकार, संधिवात, मधुमेह, पाठीच्या हाडांमध्ये अंतर असल्याने खाली बसता न येणे इत्यादी अनेक व्याधी आहेत. या व्याधींमुळे तिला ५ घंटे नामजपादी उपाय करावे लागतात. जानेवारी २०२३ आणि मार्च २०२३ मध्ये तिची ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाची शस्त्रक्रिया) झाल्यामुळे तिची प्रकृती अजून खालावली आहे. त्यामुळे तिला १ घंट्याहून अधिक वेळ बसणे कठीण होते. अशा अनेक अडचणी असूनही ती ५ घंटे जप करणे, व्यायाम करणे, नामजपादी उपाय करणे, हिंदी भाषेतील ग्रंथांचे व्याकरण पडताळणे इत्यादी व्यष्टी अन् समष्टी साधना नियमित करते.
२. स्वत: समवेत कुटुंबियांचीही व्यष्टी साधना करवून घेणे
आईने कुटुंबियांच्या नियोजनानुसार जप करणे, वास्तुशुद्धी, स्तोत्र ऐकणे इत्यादींच्या वेळा ठरवल्या आहेत. या वेळांचे ती काटेकोरपणे पालन करते आणि आमच्याकडूनही करवून घेते.
३. रुग्णाईत स्थितीतही स्थिर राहून इतरांना आधार देणे
डिसेंबर २०२२, जानेवारी २०२३ आणि मार्च २०२३ मध्ये आई रुग्णालयात भरती होती. त्या वेळी इतर रुग्णांच्या तुलनेत ती पुष्कळ स्थिर होती. यामुळे इतर रुग्णांना तिच्याकडे बघून आश्चर्य वाटायचे आणि ते तिचे अाजारपण आणि अन्य अडचणी यांसंदर्भात आईशी मनमोकळेपणाने बोलायचे. आईसह रुग्णालयात भरती झालेल्या एका महिलेची पहिली शस्त्रक्रिया योग्य प्रकारे न झाल्यामुळे तिच्या मनावर दुसर्या शस्त्रक्रियेचा ताण होता. त्या वेळी आईने त्या महिलेला नामजप, तसेच तिच्या उपास्यदेवतेला प्रार्थना करायला सांगितल्यावर तिला पुष्कळ आधार मिळाला. त्या महिलेने नामजप आणि प्रार्थना केल्यावर तिची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली. त्यामुळे नंतर तिने आईकडे येऊन कृतज्ञता व्यक्त केली.
४. सतत आनंदी रहाणे
आईला विविध शारीरिक आजार असतांनाही ती आनंदी असते. आईकडे बघून ती आजारी आहे, असे वाटत नसल्याचे साधक सांगतात.
५. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्यानंतर भावावस्थेत असणे
प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्यानंतर पुढील १ – २ घंटे आई भावावस्थेत असते. त्या वेळी ‘आजच्या दैनिकात कोणते सूत्र आले आहे ?’, असे विचारल्यास ती थोडक्यात ते सूत्र सांगते आणि त्यानंतर तिचा भाव एवढा जागृत होतो की, तिला बोलताच येत नाही. कधी कधी तिच्या डोळ्यांमध्ये अश्रूही येतात.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भात एखाद्या क्षेत्रात हिंदूंना विजय मिळाल्याचे वृत्त असले, तरी आईची भावजागृती होते आणि तिला आनंद होतो. त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व हिंदुत्वनिष्ठांना घडवत आहेत. त्यांच्या संकल्पामुळे राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भात अमुक विजय मिळाला’, असा तिचा भाव असतो.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |