१. समष्टी साधनेचा पाया ‘इतरांचा विचार करणे’ असून समष्टीमध्ये सतत ‘इतरांना काय अपेक्षित आहे ?’, हे लक्षात घेऊन परेच्छेने वागावे !
‘सद्गुरु राजेंद्र शिंदे एका प्रसंगाच्या अनुषंगाने मला म्हणाले, ‘‘तुम्ही ‘इतरांना समजून घेणे आणि प्रेमभाव वाढवणे’, यासाठी पुष्कळ प्रयत्न करायला हवेत. तुमच्यात समष्टीचा विचार अल्प आहे. समष्टीविषयी प्रेमभाव वाढण्यासाठी तुम्ही सतत देवाच्या चरणी प्रार्थना करायला हवी. आपल्याला समष्टीत ठेवल्याबद्दल साधकांनी गुरुचरणी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी) कृतज्ञ रहायला हवे. समष्टी साधनेचा पाया ‘इतरांचा विचार करणे’, हा आहे. साधकांनी ‘इतरांना काय अपेक्षित आहे ?’, हे लक्षात घेऊन परेच्छेने वागायला हवे आणि इतरांना सतत साहाय्य करायला हवे.
२. इतरांच्या चुका न पहाता स्वतःच्या चुका पहाणे आणि स्वतःमधील स्वभावदोष शोधून काढणे, हे देवाला अपेक्षित आहे. साधकांच्या मनात अयोग्य विचार आल्यास साधकांनी लगेचच देवाकडे क्षमायाचना करायला हवी.
३. ‘व्यष्टी साधनेच्या भक्कम पायावर आपण साधनेची भक्कम इमारत बांधू शकतो’, या सद्गुरु राजेंद्रदादांच्या वचनातून साधनेत घडत असल्याचा आनंद होणे
एकदा सद्गुरु राजेंद्रदादा आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना मी त्यांना म्हणाले, ‘‘सद्गुरु दादा, तुम्ही मला घडवलेत. माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधकांनाही मी तुमच्या एवढेच मानते.’’ तेव्हा सद्गुरु दादा मला म्हणाले, ‘‘त्यांनी तुमच्या व्यष्टी साधनेचा पाया भक्कम केला आहे; म्हणून आपण भक्कम इमारत बांधू शकतो.’’ तेव्हा मला वाटले, ‘सद्गुरु दादा किती आत्मविश्वासाने बोलत आहेत ! त्यांच्यामध्ये साधकांच्या प्रती किती कृतज्ञताभाव आहे !’ ‘व्यष्टी साधनेच्या भक्कम पायावर आपण साधनेची भक्कम इमारत बांधू शकतो’, या त्यांच्या वचनातूनच ‘मी साधनेत घडत गेले’, असे मला आणि त्यांनाही जाणवले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.
सद्गुरु राजेंद्रदादा अशा प्रकारे आम्हाला घडवत आहेत. आम्ही देवद आश्रमातील सर्व साधक सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– श्रीरामा, तुझ्या चरणांची दासी,
सुश्री (कु.) महानंदा गिरिधर पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.२.२०२०)