महिला अधिकार्याने केली तक्रार
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील पोलिसांनी भारतीय वायूदलातील एका महिला फ्लाइंग अधिकार्याच्या तक्रारीनंतर वायूदलाच्या श्रीनगर स्थानकातील विंग कमांडरच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. श्रीनगर येथील वायूदलाच्या मुख्यालयात विंग कमांडरने बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याची तक्रार महिला अधिकार्याने प्रविष्ट (दाखल) केली होती. या प्रकरणी वायूदलाने अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे.
नववर्षानिमित्त मेजवानीच्या वेळी केला छळ
‘३१ डिसेंबर २०२३ या दिवशी वायूदलाच्या श्रीनगर स्थानकात नववर्षानिमित्त मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा विंग कमांडरने मला खोलीत बोलावले आणि माझ्यावर बलात्कार करून नंतर मानसिक छळही केला’, असा आरोप महिला अधिकार्याने केला आहे. बडगाम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३७६ (२) अंतर्गत वायूदलाच्या विंग कमांडरच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे कलम वरिष्ठ पदावरील व्यक्तींसाठी आहे.