देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण करण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !
‘अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात, उदा. श्री गणेशाला लाल जास्वंद आणि दूर्वा आदी. याचे कारण हे की, त्या त्या वस्तूमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.
‘श्री गणेशाला फुले वाहिल्यावर वातावरणातील स्पंदनांमध्ये काय पालट होतात ?’ हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या वस्तूची सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी, अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पहाता येते. या संगणकीय प्रणालीला व्हिडिओ कॅमेर्याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे. या चाचणीतील नोंदींचे विवेचन पुढे दिले आहे.
१. चाचणीतील नोंदींचे विवेचन
या चाचणीत २ प्रयोग करण्यात आले.
१ अ. प्रयोग १ – श्री गणेशाच्या चित्राला फूल वहाणे : पहिल्या प्रयोगात ‘श्री गणेशाच्या चित्राला गुलाबाचे फूल, गुलाबी जास्वंद आणि लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील स्पंदनांमध्ये काय पालट होतात ?’, हे अभ्यासण्यात आले. यासाठी प्रथम श्री गणेशाच्या चित्राला कोणतेही फूल न वहाता ‘पी.आय.पी.’ तंत्रज्ञानाद्वारे वातावरणाचे छायाचित्र घेण्यात आले. ही ‘मूलभूत नोंद’ होय. त्यानंतर एकेक करून श्री गणेशाच्या चित्राला गुलाबाचे फूल, गुलाबी जास्वंद आणि लाल जास्वंद वाहिल्यावर त्यांची ‘पी.आय.पी.’ छायाचित्रे घेण्यात आली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘तीनही प्रकारची फुले वाहिल्यानंतर त्यातून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे समजले.
१ अ १. ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांतील (प्रभावळीतील) नकारात्मक अन् सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण, तसेच सकारात्मक स्पंदनांपैकी काही महत्त्वाच्या स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
पुढे दिलेल्या विवेचनात चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूलभूत नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.
अ. श्री गणेशाच्या चित्राला फूल वहाण्यापूर्वी तेथील वातावरणात सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ६५ टक्के होते.
आ. श्री गणेशाच्या चित्राला गुलाबाचे फूल आणि गुलाबी जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अनुक्रमे ५६ अन् ६४ टक्के आहे, म्हणजे मूलभूत नोंदीच्या तुलनेत ते घटले आहे.
इ. श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ८० टक्के आहे, म्हणजे मूलभूत नोंदीच्या तुलनेत ते पुष्कळ वाढले आहे.
१ अ २. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व (चैतन्य) आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
यातून ‘हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे अध्यात्मशास्त्र आहे’, हे लक्षात येते. हे समजून घेऊन कृती करूया आणि चैतन्याचा लाभ करून घेऊया.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.७.२०२४)
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
वाचकांना विनंती
या संशोधनाच्या अंतर्गत दुसरा प्रयोग श्री गणेशाच्या चित्राला पत्री वहाण्याच्या संदर्भात करण्यात आला. या वेळी तुळस आणि दूर्वा वाहिल्यावर वातावरणातील स्पंदनांमध्ये काय पालट होतात ?’, हे अभ्यासण्यात आले. या संदर्भातील संशोधन आणि त्याच्याशी संबंधित ‘पी.आय.पी.’ छायाचित्रे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.