Brain Cancer : भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही ! – ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’

३ दशकांच्या प्रदीर्घ संशोधनातून शास्त्रज्ञांनी मांडला निष्कर्ष !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – भ्रमणभाषच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे निष्कर्ष गेल्या ३ दशकांच्या प्रदीर्घ संशोधनाअंती काढण्यात आला आहे. आतापर्यंत असा समज होता की, रेडिओ लहरी या अत्यंत घातक असून भ्रमणभाषच्या सातत्याच्या वापरामुळे मेंदूचा कर्करोग होतो. वर्ष २०११ मध्ये ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेने एका अभ्यासाअंती असाच निष्कर्ष काढल्याने या समजाला आणखीनच आधार मिळाला होता; परंतु रेडिओ लहरींचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो ? याविषयीचा अभ्यास चालूच होता. आता झालेल्या या संशोधनासंदर्भातील लेख ‘एन्व्हायर्न्मेंटल इंटरनॅशनल’ या जर्नलच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.

१. विशेष म्हणजे हे संशोधन ‘रेडिओ लहरींमुळे मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते’, या समजाला केंद्रस्थानी ठेवूनच करण्यात आले होते. ‘मेंदूच्या कर्करोगाशी या लहरींचा काहीही संबंध नाही’, असा निष्कर्ष यातून काढण्यात आला.

२. दीर्घकालीन अभ्यासानंतर बहुतांश शास्त्रज्ञांचे मेंदूच्या कर्करोगामागे समजले जाणार्‍या कारणाविषयीचे मत पालटले आहे.

३. वर्ष १९९४ ते २०२२ या कालावधीत ६३ अभ्यासांचे निष्कर्ष नियतकालिकांत प्रसिद्ध करण्यात आले होते. गेल्या ३ दशकांतील या संशोधनातून असे लक्षात आले की, ‘वायरलेस तंत्रज्ञाना’चा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणावर झाला असला, तरी मेंदूचा कर्करोग झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही.