लहान लहान प्रसंगातून सतत दुसर्‍यावर प्रेम करायला शिकवणारी गुरुमाऊली !

सौ. स्‍वाती शिंदे

‘काही वर्षांपूर्वी एक साधिका प्रसारातील सेवा करण्यासाठी रामनाथी आश्रमातून बाहेरगावी जाणार होती. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी तिच्याशी जवळीक असणारे बरेच साधक-साधिका आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जमले होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेसुद्धा त्यांच्या खोलीच्या आगाशीत (गच्चीत) तिला निरोप देण्यासाठी आले होते. ती साधिका निघाल्यावर माझे हात जोडले गेले. थोडा वेळ माझे हात जोडलेलेच होते. तेव्हा माझ्याकडे पाहून गुरुदेव म्हणाले, ‘‘त्या साधिकेचा प्रवास सुखरूप व्हावा, तिला कोणती अडचण येऊ नये; म्हणून तू देवाला प्रार्थना करत आहेस का ?’’ खरेतर असा कोणताही विचार माझ्या मनात नव्हता; पण गुरुदेवांनी तसे विचारल्यावर माझ्याकडून तशी प्रार्थना झाली. यानंतर जेव्हा कधी मी कुणाला प्रवासासाठी निरोप द्यायला जाते, तेव्हा माझ्याकडून त्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी देवाला प्रार्थना होते. त्यातून त्या व्यक्तीविषयी माझ्या मनात प्रेम, जिव्हाळा आणि आपलेपणा निर्माण होत असल्याचे मी अनुभवले. गुरुदेवांनी त्या प्रसंगातून ‘साधनेचे प्रयत्न लहान लहान प्रसंगातूनही कसे होऊ शकतात’, याविषयी मला शिकवले. माझ्या अंतर्मनावर तो संस्कार केला. यासाठी मला गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता वाटली.’

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२३)