सध्या विविध कारणांमुळे अनेक जण चिंता, ताण, नैराश्य यांच्या अधीन झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आलेले आहे. ते तणावपूर्ण जीवनशैली जगत आहेत. अशा व्यक्तींना तणावावर मात करता यावी किंवा त्याला सामोरे जाता यावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनांच्या वतीने विनामूल्य ‘टेली मानस’ ही सुविधा चालू करण्यात आली आहे. यामध्ये ‘टेली मानस’च्या सुविधेसाठी संपर्क करणार्यांना तज्ञांकडून विनामूल्य भ्रमणभाषवरूनच समुपदेशन करण्यात येते. याचा लाभ सर्व तणावग्रस्तांनी घ्यावा, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यामध्ये ठाणे येथील एका समुपदेशन केंद्रामध्ये प्रतिदिन सरासरी ३० ते ४० जण संपर्क करतात. ही एका केंद्राची आकडेवारी आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्रातील आकडेवारी किती असेल, याचा अंदाज येतो. संपर्क करणार्यांमध्ये परीक्षेचा ताण असणारे विद्यार्थी, कौटुंबिक समस्या असणारे, तसेच भविष्याची काळजी वाटणारे यांचा समावेश अधिक आहे. यामुळे ‘टेली मानस’ ही संकल्पना शासनाला का राबवावी वाटली ? याचा विचार करता येईल. समाजातील अनेक जण तणावात आहेत आणि हा तणाव प्रत्येकाच्या नियंत्रणाच्या बाहेर जात आहे, त्यामुळे अशा व्यक्तींना त्वरित साहाय्य न केल्यास त्यांचे पुढील जीवन निराशाजनक आणि दुःखी होऊ शकते. समाज दुःखी आणि निराश झाल्यास देशाचे भवितव्यही अंधारमय होऊ शकते. त्यामुळे शासनाला ‘टेली मानस’ ही संकल्पना राबवावी वाटली, हे अभिनंदनीयच आहे. व्यक्तीला कोणत्याच गोष्टीचा ताण यायला नको, यासाठी खर्या अर्थाने काय करायला हवे, याचाही विचार व्हायला हवा; कारण कोणत्याही गोष्टीवर कायमस्वरूपी आणि परिपूर्ण उपाययोजना मिळाल्यास त्याची फलनिष्पत्ती अधिक मिळते.
मानसिक ताण म्हणजे दुःख ! मनुष्याच्या जीवनात येणार्या दुःखाचे अध्यात्मशास्त्रानुसार कारण पाहिल्यास जीवनातील ८० टक्के समस्या या आध्यात्मिक कारणांमुळे येतात. त्यामुळे उपाययोजना आध्यात्मिक स्तरावर काढल्यास ८० टक्के समस्या सुटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाययोजना समजण्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. हिंदु धर्म हा जीवन जगण्याचे सिद्धांत सांगतो. त्यामुळे जीवन कसे जगल्यास आनंद मिळतो, हे समजते. कर्मफल सिद्धांतानुसार कोणतीही कृती योग्य होण्यासाठी कृती करतांना ‘देव माझ्याकडे पहात आहे’, या जाणीवेने केल्यास कोणतेही कर्म अयोग्य होणार नाही, तसेच प्रतिदिन नामस्मरण केल्यामुळे देवाप्रतीची भक्ती वाढते, देवाचे साहाय्य मिळते आणि त्यातूनही ‘देव आहे’, ही श्रद्धा वाढते. याचा परिणाम भविष्याची चिंता निघून जाते. त्यामुळे समाजाला खर्या अर्थाने तणावमुक्त करण्यासाठी शासनाने शाळांमधून धर्मशिक्षण देण्याला प्राधान्य द्यावे !
– वैद्या (सुश्री) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.