पुणे – शहरातील गणेशोत्सव मंडळांना महापालिकेकडून परवाने देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार केलेल्या मंडप धोरणानुसार गणेशोत्सव मंडळांना परवाने दिले आहेत. मंडळांकडून टाकण्यात येणारे मांडव धोरणांप्रमाणे आहेत कि नाही, हे क्षेत्रीय कार्यालयांकडून पहाणे आवश्यक आहे. त्यानुसार किती मंडळांची मंडपाची जागा अनुमतीनुसार आहे, याची तपासणी क्षेत्रीय कार्यालयाने करून त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
महापालिकेने वर्ष २०१९ मध्ये शेवटची अनुमती दिली होती. त्यानंतर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडळांना विशेष बाब म्हणून ही अनुमती ५ वर्षांसाठी कायम ठेवली आहे. त्यामुळे मंडळांना आता वर्ष २०२७ पर्यंत कोणतीही अनुमती घ्यावी लागणार नाही. या मंडप धोरणाची कार्यवाही करण्याचे दायित्व अतिक्रमण विभागाकडे असून उत्सवानंतर त्याचा अहवाल न्यायालयात सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ही माहिती मागवली आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांकडून रस्ते बंद करणे, तसेच वाहतुकीस अडथळे निर्माण होतील, अशा प्रकारे मांडव उभारले जात आहेत. त्याविषयी मंडळांना सूचना देण्यासही सांगण्यात आले आहे.