तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला डिवचले !
मॉस्को (रशिया)/बीजिंग (चीन) – तैवानने आता चीन आणि रशिया यांच्यातील वाढत्या मैत्रीवर उपरोधिक टीका केली आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह यांनी म्हटले आहे की, जर चीनचा तैवानवरील दावा प्रादेशिक अखंडतेशी संबंधित असेल, तर चीन सरकारने रशियाकडून १० लाख चौरस कि.मी. भूमी परत घ्यावी. आज रशिया सर्वांत दुर्बल आहे आणि चीनला त्याची भूमी परत घेण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
चीनचा दावा आहे की, तैवान हा त्याचा भूभाग असून तो कोणत्याही परिस्थितीत परत घेतला जाईल. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यामुळे रशिया आणि चीन यांच्यामधील सीमावाद पुन्हा समोर आला आहे.
काय आहे रशिया आणि चीन यांच्यातील भूमीचे प्रकरण ?
रशिया आणि चीन यांच्यामधील सीमावादाचे मूळ वर्ष १८५८ मध्ये झालेला करार आहे. दुसर्या अफू युद्धात चीनच्या पराभवाच्या वेळी रशियातील राजेशाही आणि चीनमधील राजाचा अधिकारी यिशान यांच्यात हा करार झाला होता. या करारानंतर रशियाला चीनची १० लाख चौरस कि.मी. भूमी मिळाली. यामध्ये रशियातील व्लादिवोस्तोक शहराचा समावेश आहे. चीनच्या भूभागावर रशियाच्या नियंत्रणावरून अनेकदा चीनमध्ये आवाज उठवला गेला आहे. चिनी राष्ट्रवादी लोकांनी नुकतेच हे सूत्र उपस्थित करून व्लादिवोस्तोकवर स्वतःचा दावा सांगितला होता. ‘पुतिन यांनी व्लादिवोस्तोक परत करावा’, अशी मागणी त्यांनी केली होती.
तज्ञांचे म्हणणे आहे की, चीनचा व्लादिवोस्तोक भागावर डोळा आहे. याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे येथील भूमीमध्ये दडलेली नैसर्गिक संसाधने. व्लादिवोस्तोकच्या पूर्व भागात तेल आणि वायू यांचे प्रचंड नैर्गिक साठे आहेत. भारत आणि जपान यांनीही येथे येथे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीन त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी सीमावर्ती भागात सातत्याने त्याच्या नागरिकांना पाठवत आहे. चीनचा धोका लक्षात घेऊन रशिया भारताला व्लादिवोस्तोकला लागून असलेल्या भागात एक शहर स्थापन करण्यास सांगत आहे. भारत या क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. तैवाननंतर चीन रशियाकडून त्याचा भूभाग परत घेईल, असे एका चिनी तज्ञाने म्हटले होते.