Manipur Terror attack : मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ जण ठार !

मणिपूर येथे हत्या झालेली महिला

इंफाळ – इंफाळ जिल्ह्यातील पश्‍चिम भागात १ सप्टेंबर या दिवशी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात एका महिलेसह २ जण ठार झाले. महिलेची ८ वर्षांची मुलगी आणि १ पोलीस अधिकार्‍यासह ९ जण घायाळ झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतंकवाद्यांनी डोंगराच्या वरच्या भागांतून कोत्रुक आणि कडंगबंद खोर्‍याच्या खालच्या भागांत गोळीबार केला आणि ड्रोनद्वारे बाँब टाकले. (आतंकवाद्यांकडे एवढी आधुनिक शस्त्रे आली कुठून ? सरकारी यंत्रणा याचा शोध घेणार का ? – संपादक) अचानक झालेल्या या आक्रमणामुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध यांच्यासह अनेकांना सुरक्षित स्थळी जावे लागले.

भाजपच्या नेत्याच्या घराला ख्रिस्ती कुकी समुदायाने लावली आग !

मणीपूरमध्ये भाजपचे नेतेच सुरक्षित नसतांना तेथील ख्रिस्ती कुकी समुदायाला वठणीवर आणण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार काही प्रयत्न करणार का ?

पेनियलमध्ये भाजपचे प्रवक्ते टी. मायकल एल् हाओकीप यांच्या घराला आग लावण्यात आली. हाओकीप यांनी याविषयीचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला असून ‘कुकी समुदायातील लोकांनी हे आक्रमण केले आहे’, असा आरोप केला आहे. हाओकीप यांनी सांगितले की, वर्षभरात तिसर्‍यांदा त्यांच्या घरावर आक्रमण झाले आहे. गेल्या आठवड्यातही ३० हून अधिक सशस्त्र लोकांनी त्यांच्या घरावर आक्रमण केले होते.  त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत.

कुकी-जो संघटनेकडून मणिपूरमध्ये कुकीलँडची मागणी !

स्वतंत्र कुकीलँड म्हणजे ख्रिस्ती प्रदेश असणार, हे वेगळे सांगायला नको. अशांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे !

कुकी-जो समुदायाच्या लोकांनी मणीपूरमधील चुराचंदपूर, कांगपोकपी आणि टेंगनौपाल येथे रॅली काढल्या. मणीपूरमध्ये स्वतंत्र कुकीलँड बनवण्यात यावे आणि तो केंद्रशासित प्रदेश असावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. ‘पुद्दुचेरीच्या धर्तीवर विधानसभेसह केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे, हाच राज्याला जातीय संघर्षातून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग आहे’, असे या संघटनांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

ईशान्येकडील राज्यांमध्ये फोफावलेला आतंकवाद नष्ट करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?