भारतातील चित्रपट क्षेत्रात महत्त्वाचा समजला गेलेला राष्ट्रीय पुरस्कार ‘वारसा’ या माहितीपटाला मिळाला आहे. वर्ष २०२२ साठीचा हा पुरस्कार नुकताच घोषित झाला. सचिन सूर्यवंशी यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर आधारित विषय या चित्रपटात त्यांनी हाताळला आहे. कुस्तीचे शहर असलेल्या कोल्हापुरात या माहितीपटाचे संशोधन आणि चित्रीकरण सलग २ वर्षे झाले. मर्दानी खेळाडू आणि त्यांना घडवणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ जपत आहेत. समाजातील क्षात्रवृत्ती जागृत ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे, असेच म्हणावे लागेल. हे मर्दानी खेळ म्हणजे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची युद्धकलाच आहे. या युद्धकलेच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ५ पातशाह्यांना धूळ चारली, हिंदूंचे रक्षण केले. आज हिंदू ‘हिंदु’ म्हणून आहेत, याचे मुख्य कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपतींच्या गादीची परंपरा चालवणार्या कोल्हापुरात हे मर्दानी खेळ ज्यांनी जिवंत ठवले आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच आहे. या युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक नागरिक कसा प्रयत्न करत आहेत, हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे.
या चित्रपटाला मिळालेला पुरस्कार हा एक प्रकारे मराठी मातीचा गौरव आहे. मराठी संस्कृती, मराठी परंपरा यांचा गौरव आहे. मराठ्यांच्या क्षात्रवृत्तीने केवळ मराठ्यांचे नाही, तर देशाचे रक्षण केले आहे. या मर्दानी खेळांना खरे तर सरकारने जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या खेळातून त्यांच्यातील क्षात्रवृत्ती टिकली, वृद्धींगत झाली आहे. स्वरक्षणासाठी या खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज देशातील हिंदूंची आणि त्यांच्या स्त्रियांची स्थिती शिवकालीन हिंदूंसारखीच झाली आहे, असे म्हटले, तर अजिबात चुकीचे ठरणार नाही. देशातील नवरात्रोत्सव, गणेशोत्सव यांच्या मिरवणुका विनादगडफेकीच्या पार पडल्या, असे होत नाही. धर्मांधांची अरेरावी एवढी वाढली आहे की, ते काही ना काही निमित्त शोधतात आणि हमरीतुमरीवर येऊन लगेच शस्त्राने आक्रमण करतात. हिंदूंच्या आंदोलनावर कधी दगडफेक होईल, हे सांगता येत नाही. लव्ह जिहादविरोधी निघालेल्या हिंदूंच्या आंदोलनावरही नुकतीच दगडफेक झाली. हिंदु मुली आणि महिला यांच्या संदर्भातील अत्याचारांनी टोक गाठले आहे. आजही युवा मुला-मुलींनी हे खेळ शिकून स्वरक्षण करणे आवश्यक आहे. समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास साहाय्यभूत असणार्या या खेळाचा गौरव खर्या अर्थाने तेव्हाच होईल, जेव्हा बहुसंख्य हिंदु युवक युवती त्यांच्या दैनंदिन जीवनात याचा अंगीकार करून त्यांच्यात लढाऊवृत्ती बाणवतील !
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.