NCERT New Proposal : ९ वी ते १२ वीपर्यंतच्‍या मूल्‍यमापनात अमूलाग्र पालट : ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा नवा प्रस्‍ताव !

केंद्र शासनासमोर सादर

नवी देहली – ‘राष्‍ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने, म्‍हणजेच ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने इयत्ता बारावीच्‍या बोर्ड परीक्षेच्‍या निकालासाठी नवे मूल्‍यमापन प्रस्‍तावित केले आहे. यांतर्गत इयत्ता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण बारावीच्‍या निकालात समाविष्‍ट करण्‍याचा प्रस्‍ताव आहे. यातून व्‍यावसायिक आणि कौशल्‍य आधारित प्रशिक्षणावर जोर देण्‍याचा परिषदेचा मानस आहे. हा प्रस्‍ताव केंद्रशासनाला पाठवण्‍यात आला आहे.

‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने ‘एस्‍टॅब्‍लिशिंग इक्‍विवॅलेन्‍स अ‍ॅक्रॉस एज्‍युकेशन बोर्ड्‌स’ (सर्व शैक्षणिक बोर्डांना समान करणे) या शीर्षकाखाली अहवाल सादर केला आहे. इयत्ता नववीतील एकूण गुणांपैकी १५ टक्‍के, इयत्ता दहावीतील २० टक्‍के आणि इयत्ता अकरावीतील २५ टक्‍के गुण बारावीच्‍या निकालामध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात येईल. थोडक्‍यात इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतच्‍या एकूण गुणांच्‍या ६० टक्‍के गुण बारावीच्‍या निकालात समाविष्‍ट होतील.

विद्यार्थ्‍यांचे रचनात्‍मक आणि संकलनात्‍मक या २ सूत्रांवर आधारित मूल्‍यमापन !

इयत्ता बारावीसाठीचे मूल्‍यपामन रचनात्‍मक आणि संकलनात्‍मक पद्धत यांनी विभागले जाईल. रचनात्‍मक मूल्‍यमापनात आत्‍मचिंतन, विद्यार्थ्‍यांचा कल, शिक्षक मूल्‍यांकन, तसेच इतर स्‍पर्धांमधील सहभागानुसार गुणांकन केले जाईल. दुसरीकडे संकलनात्‍मक मूल्‍यमापनात परीक्षेतील गुणांचा विचार केला जाणार आहे.

नव्‍या प्रस्‍तावानुसार इयत्ता नववीमध्‍ये ७० टक्‍के रचनात्‍मक आणि ३० टक्‍के संकलनात्‍मक विभाजन असेल. दहावी इयत्तेत दोघांना समान गुण, तर इयत्ता अकरावीत ४० टक्‍के रचनात्‍मक आणि ६० टक्‍के संकलनात्‍मक गुण दिले जातील. इयत्ता बारावीमध्‍ये ३० टक्‍के रचनात्‍मक आणि ७० टक्‍के संकलनात्‍मक विभाजन असेल.