खरेतर या ‘साम्यवादी इकोसिस्टीम’ने, म्हणजेच अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून हिंदु संस्थांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह सेट’ (खोटे कथानक प्रस्थापित) केले आहेत. अशा बिकट काळात हिंदु संस्थांच्या बाजूने भूमिका प्रस्तुत करणे आणि या साम्यवादी इकोसिस्टीमचा बुरखा फाडणे, हे कठीण कार्य आहे.
गेली २५ वर्षे सनातन संस्था हिंदु धर्माचे प्रचाराचे कार्य अत्यंत तेजस्वीपणे करत आहे. हे वर्ष सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून याच काळात संस्थेला ‘आतंकवादी संस्था’ ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न झाला. निरीश्वरवाद्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहस्रो साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. असा संघर्षाचा काळ अनुभवत सनातन संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास झाला आहे. या २५ वर्षांत सनातनचा छळ करणारे दुसरे-तिसरे कुणी नव्हते, तर अर्बन नक्षलवाद्यांची साम्यवादी (लेफ्ट) इकोसिस्टीम होती ! अंधश्रद्धा निर्मूलनवादी संघटनांच्या नावाने ही साम्यवादी इकोसिस्टीम कार्य करत होती.
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, ही चळवळ प्रथम कोल्हापूर येथे चालू झाले. त्या वेळी तिचे नाव होते ‘मानवीय नास्तिक मंच’ ! यातील नास्तिक शब्दाचा अर्थ काय ? नास्तिक म्हणजे देव-धर्म न मानणारे ! ज्यांना देव-धर्म मानायचा नाही, त्यांचा मंच होता तो. पुढे त्याला ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, असे गोंडस नाव ठेवण्यात आले.
अर्बन नक्षलवाद्यांची ‘इकोसिस्टीम’ कशी कार्यरत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. देशातील बस्तर, गडचिरोली, दंडकारण्य या भागांतील नक्षलवाद आपण ऐकलेला आहे. नक्षलवाद म्हटले की, हिंसाचार, घातपात, वनवासी नागरिक, पोलीस, तसेच सैनिक यांच्या क्रूर पद्धतीने केलेल्या हत्या हे डोळ्यांसमोर उभे रहाते; मात्र गेल्या काही काळापासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, देहली, भाग्यनगर, चेन्नई, अशा प्रमुख शहरांतून पसरवला जाणारा ‘अर्बन नक्षलवाद’ काय आहे ? त्यांचा ‘अजेंडा’ म्हणजेच उद्देश काय आहे ? हे आपल्याला माहिती नसते. मध्यंतरी देशात ५-६ अर्बन नक्षलवाद्यांना अटक झाली, तेव्हा कुठे अर्बन नक्षलवादी असा काही तरी शब्द आहे, हे आपल्याला लक्षात आले. साम्यवाद्यांच्या भाषेत या इकोसिस्टीमला ‘लेफ्ट इकोसिस्टीम’ म्हणतात.
१. ‘साम्यवादी (लेफ्ट) इकोसिस्टीम’ काय आहे ?
अ. तुम्ही जेव्हा सामाजिक कार्यकर्ते असता, तेव्हा तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनवादी नाव धारण करता !
आ. जेव्हा तुम्ही स्त्री हक्कांच्या चळवळीतील कार्यकर्ते असता, तेव्हा तुम्ही ‘फेमिनिस्ट’ (स्त्रीवादी), हे नाव धारण करता !
इ. जेव्हा तुम्ही धर्माच्या संदर्भात बोलता, तेव्हा तुम्ही ‘नास्तिकतावादी म्हणजे रॅशनलिस्ट’, हे नाव धारण करता !
ई. जेव्हा तुम्ही राजकीय कार्य करता, तेव्हा तुम्ही ‘साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट’, म्हणून नाव धारण करता !
उ. जेव्हा तुम्ही साम्यवाद आणण्यासाठी हिंसेचे मार्ग पत्करता, तेव्हा तुम्ही ‘नक्षलवादी’ म्हणून नाव धारण करता !
ऊ. जेव्हा तुम्ही साम्यवादासाठी विवेकवादी म्हणून कार्य करतात, तेव्हा तुम्ही ‘अर्बन नक्षलवादी’ असता !
थोडक्यात यांचे मुखवटे वेगळे असतात. विचारधारा एकच असते. यांचे नेतृत्व साम्यवादी इकोसिस्टीम करत असते. या इकोसिस्टीममध्ये विद्यापिठांचे प्राध्यापक, साहित्यिक, बॉलीवूडमधील अभिनेते-अभिनेत्री, माध्यमांचे संपादक-पत्रकार, विविध माध्यमेसुद्धा यांचे भाग असतात. केवळ एवढेच नाही, तर लोकशाहीवादी किंवा ‘संविधान बचाव’ चळवळींसम नावाखाली कार्य करणारेसुद्धा या इकोसिस्टीमचा भाग असतात !
ही इकोसिस्टीम प्रसारमाध्यमांतून म्हणजे टीव्ही मिडिया, फिल्म मिडिया, रेडिओ मिडिया, प्रिंट मिडिया, नेट मिडिया (वायर, प्रिंट, न्यूजलाऊंड्री), बुक मिडिया (पुस्तक माध्यम) आणि सामाजिक माध्यमे यांतून स्वतःच्या साम्यवादी विचारांचा प्रचार करणारी व्यवस्था निर्माण केली आहे. या साम्यवादी मंडळींनी मिडियातील बराचसा भाग कह्यात घेतला आहे. हिंदुत्वनिष्ठांना अक्षरशः बहिष्कृत केले आहे.
२. मिडियात बसलेले अर्बन नक्षलवादी ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) बनवतात ही धोक्याची घंटा !
आजकाल ‘निर्भय बनो’ नावाची एक तथाकथित लोकशाहीवादी चळवळ पुणे-मुंबई शहरात चालू आहे. वागळे, सरोदे, चौधरी ही पत्रकार, अधिवक्ता आणि पर्यावरणवादी म्हणून ओळख दाखवणार्यांची ही ‘निर्भय बनो’ चळवळ नेमकी काय आहे, याचा कुणी शोध घेतला आहे का ? ते केवळ भारताच्या विरोधात बोलतात आणि स्वतःला ‘लोकशाही अन् राज्यघटनेचे रक्षक’ म्हणवतात. विश्वंभर चौधरी यांना कुणी देशभक्ताने भर कार्यक्रमात थोबाडीत मारली, तर त्याविषयी साम्यवादी इकोसिस्टीममधील माध्यमांनी लगेच बातम्या प्रकाशित केल्या. त्यानंतर त्याविषयी विश्वंभर चौधरी हे लगेचच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांशी दूरभाषवर बोलले ? मला सांगा, किती हिंदुत्वनिष्ठांना थेट गृहमंत्र्यांशी दूरभाषवर बोलता येईल, अशी सोय आहे ?
आज लोकशाहीवाद किंवा राज्यघटना रक्षक भूमिकेतून राखीव जागांचे समर्थन होते. मिडियाही या संदर्भात पानोपानी बातम्या प्रकाशित करत असतो; परंतु जेव्हा नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (‘सीएए’चे) सूत्र येते, तेव्हा ‘शरणार्थी बांगलादेशी हिंदूंना नागरिकत्व नको’, अशी भूमिका का घेतली जाते ? आज बांगलादेश धगधगत आहे. हिंदू मोठ्या प्रमाणात पलायन करण्याच्या स्थितीत आहेत. अशा वेळी हिंदु भारताखेरीज त्यांना कोणता आधार आहे ? परंतु मिडिया याविषयी ‘ब्र’ही काढत नाही. हा दोष मिडियाचा नाही, तर तेथे बसलेल्या अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
भावनांना उद्देपित करणारे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) मिडियात बसलेले अर्बन नक्षलवादी बनवतात ? एक उदाहरण सांगतो, ‘जी.एन्. साईबाबा यांची सुटका झाल्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये एक पानभर विस्तृत लेख प्रकाशित झाला –
‘10 years in Jail for nothing ! Who should pay for it ?’ (१० वर्षे तुरुंगात काही नाही ! त्याची किंमत कुणी द्यावी ?) अर्बन नक्षलवादी सुटल्यानंतर त्यांचे उदात्तीकरण करणारे लेख, मुलाखती प्रकाशित करणारे मिडियात बसलेले अर्बन नक्षलवादीच करत असतात. जेव्हा पुन्हा वरवरा राव, पाद्री स्टेन सामी, अरुण परेरा ही अर्बन नक्षलवादी मंडळी पकडली गेली, तेव्हाही अशा प्रकारे ते कसे सामाजिक कार्यकर्ते आहेत, असे सांगणारे लेख प्रकाशित झाले होते. आज डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ८ वर्षे कारागृहात ठेवून नंतर डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात निर्दाेष ठरवल्यानंतर असा एक तरी लेख वृत्तपत्रात प्रकाशित झाला का ?
नालासोपाराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भर न्यायालयात म्हणाले होते, ‘सनातन ही आध्यात्मिक संस्था आहे. तिच्या वेबसाईटवर अध्यात्माची माहिती आहे. तिच्यावर बंदी नाही; मग तुम्ही कशाच्या आधारे संस्थेला आतंकवादी म्हणता ?’ हे अत्यंत महत्त्वाचे वाक्य माध्यमांमध्ये कुठे झळकले का ? अर्बन नक्षलवादी पाद्री स्टेन सामी तुरुंगात मरण पावला. त्याच्या चांगुलपणाविषयी वृत्तपत्री मोठमोठे लेख प्रकाशित झाले; पण त्यांच्या अर्बन नक्षलवादाच्या देशविरोधी कृत्याविषयी मौन बाळगले गेले ! अर्बन नक्षलवादी कुणाविषयी सहानुभूती निर्माण करायची आणि कुणाविषयी करायची नाही, हे ठरवत असतात ! थोडक्यात काय छापायचे आणि काय टाळायचे, हे अर्थात् कुठले ‘नॅरेटिव्ह’ चालवायचे, हे मिडियात बसलेले अर्बन नक्षलवादी ठरवत आहेत. ही धोक्याची घंटा आहे !
अर्बन नक्षलवादाशी जोडलेल्या डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, प्रा. कलबुर्गी, साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश या ४ हत्या झाल्यावर देशातील साम्यवादी विचारांच्या मान्यवरांनी ‘पुरस्कारवापसी’पासून भारतात रहाण्याची भीती वाटू लागली इथपर्यंत ओरड चालू केली. भारतात मागील २५ वर्षांत नक्षलवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक सैनिक, पोलीस, राजकीय नेते, सामान्य नागरिक यांच्या हत्या केलेल्या आहेत; देशभरात कमलेश तिवारी, किशन भरवाड, प्रवीण नेट्टारू, प्रशांत पुजारी यांच्यासारख्या सहस्रो हिंदुत्वनिष्ठांच्या ज्या हत्या केल्या गेल्या, त्यांच्या संदर्भात कधीही चर्चा केली जात नाही.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (२०.८.२०२४)