America’s naval base in Bangladesh! अमेरिकेचा बांगलादेशात नौदल तळ उभारण्‍याचा विचार !

अमेरिकेच्‍या नौदलाच्‍या शिक्षणसंस्‍थेच्‍या नियतकालिकातील लेखात याविषयी ऊहापोह !

शेख हसीना आणि जो बायडेन

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्‍ये(Bangladesh) विद्यार्थ्‍यांच्‍या हिंसक आंदोलनामुळे शेख हसीना (Sheikh Hasina) यांना पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र देऊन देश सोडून भारतात(India) आश्रय घ्‍यावा लागला. ‘शेख हसीना यांनी बांगलादेशाचे सेंट मार्टिन बेट (Saint Martin Island) अमेरिकेला(America) न दिल्‍यामुळेच त्‍यांना सत्ताच्‍युत करण्‍याचे षड्‍यंत्र रचण्‍यात आले’, असे म्‍हटले जात आहे; मात्र शेख हसीना यांच्‍या मुलाने हा दावा फेटाळून लावला आहे. आता या बेटाच्‍या संदर्भात अमेरिकी नौदल शिक्षणसंस्‍थेच्‍या प्रतिष्‍ठित नियतकालिकात एक लेख प्रकाशित झाला आहे, ज्‍यामध्‍ये बांगलादेशात अमेरिकेच्‍या नौदलाने तळ उभारणे का महत्त्वाचे आहे, याविषयी माहिती देण्‍यात आली आहे. या लेखात अमेरिका बांगलादेशात नौदल तळ उभारण्‍याचा विचार करत असल्‍याचे म्‍हटले आहे.

१. ढाका विद्यापिठातील आंतरराष्‍ट्रीय संबंधांचे व्‍याख्‍याते तनवीर अहमद आणि पृथु बिस्‍वास यांच्‍या या लेखात इंडो-पॅसिफिक प्रदेशातील एक महत्त्वाचे सूत्र म्‍हणून या बेटाचा उल्लेख आहे.

२. लेखात म्‍हटले आहे की, बांगलादेश अमेरिकी नौदलासाठी महत्त्वाचे केंद्र असू शकते. व्‍यापक इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी कारवायांमध्‍ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

३. बांगलादेशामध्‍ये नौकाबांधणी उद्योग आहे. कोणत्‍याही संघर्षाच्‍या वेळी त्‍याच्‍या नौदलाच्‍या मालकीच्‍या सुविधा अमेरिकेच्‍या नौदलाचे रक्षण करण्‍यास समर्थ आहेत. तसेच बांगलादेशाचे नौदल तळ इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेच्‍या नौदलाच्‍या कारवायांसाठी वापरले जाऊ शकतो.

४. बांग्‍लादेशाचे नौदल तळ कोणत्‍याही संभाव्‍य संघर्षाच्‍या वेळी अमेरिकेच्‍या नौदलासाठी केंद्र आणि सुरक्षित बंदर बनू शकतो. बंगालच्‍या उपसागरात सध्‍या अमेरिकेचा तळ नाही. बांगलादेश, त्‍याचे मनुष्‍यबळ, नौकाबांधणी उद्योग आणि व्‍यावसायिक नौदल, अमेरिकेच्‍या नौदलाच्‍या नौकांना विश्रांती आणि अन्‍य कारणांसाठी जागा देऊ शकतोे.

५. बांगलादेश सध्‍या कॉक्‍स बाजारमधील मातरबारी येथे खोल बंदर बांधत आहे. यात जपान साहाय्‍य करत आहे, जो आशियातील अमेरिकेचा सर्वांत विश्‍वासार्ह मित्र आहे.

६. बांगलादेश आणि अमेरिका यांच्‍यातील संबंधांसाठी जपान साहाय्‍य करू शकतो. यामुळे बंगालच्‍या उपसागरात चीनविरुद्ध अमेरिकेला लाभ होईल.

संपादकीय भूमिका

शेख हसीना यांनी अमेरिकेला बांगलादेशात तळ उभारण्‍यास नकार दिल्‍याने त्‍यांना सत्ताच्‍युत करून देशातून पलायन करण्‍यास भाग पाडण्‍यात आल्‍याचे म्‍हटले जात होते, ते सत्‍य आहे, असेच यातून स्‍पष्‍ट होत आहे !