पंतप्रधान मोदी यांनी वॉर्सा (पोलंड) येथील कोल्हापूर स्मारकाला दिली भेट !
वॉर्सा (पोलंड) – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या पोलंड दौर्यावर आहेत. त्यांनी पोलंडची राजधानी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला भेट दिली. मोदी यांनी ‘एक्स’वर मराठी भाषेत पोस्ट करत म्हटले, ‘आज मी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसर्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुले यांना आश्रय देण्यात कोल्हापूरचे राजघराणे आघाडीवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य देत पोलिश महिला आणि मुले यांना सन्मानाने जगता येईल याकडे लक्ष दिले. करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.’
वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण केली. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित… pic.twitter.com/V0kDmwGRxy
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2024
मराठी संस्कृतीत मानवधर्म आणि आचरण यांना सर्वाधिक प्राधान्य !
पंतप्रधान मोदी यांनी वॉर्सा येथील भारतीय नागरिकांना प्रारंभी मराठीतून संबोधित केले. ते म्हणाले की, वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक हे महाराष्ट्रातील नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीप्रती पोलंडच्या नागरिकांनी व्यक्त केलेला सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानवधर्म आणि आचरण यांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापूरच्या राजघराण्याने पोलंडमधील महिला आणि मुले यांना आश्रय दिला होता. त्यांच्यासाठी कोल्हापूरमधील वळिवडे येथे एक मोठी वसाहत उभी केली होती. पोलिश महिला आणि मुले यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी दिवसरात्र एक केला होता. महाराष्ट्राच्या त्याच साहाय्याला पोलंडने वंदन केले आहे.
The monument in Poland is a tribute to the illustrious royal family of Kolhapur! – Prime Minister Modi
PM Modi visits the Kolhapur Memorial in Warsaw, Poland
Marathi culture gives utmost priority to human values and conduct – PM Modi #KolhapurGloryInPoland pic.twitter.com/P0HWesCthi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 22, 2024
काय आहे प्रकरण ?
दुसर्या महायुद्धाच्या काळात अनेक पोलंडवासियांना देश सोडून विस्थापित व्हावे लागले होते. त्या वेळी भारतात आलेल्या जवळपास २ सहस्र ३०० पोलंडवासियांना कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी आश्रय दिला होता. त्यांच्यासाठी वळिवडे येथे मोठी वसाहत उभी केली होती. रहाण्यासाठी खोल्या, तसेच छोटे चर्चही बांधले होते. परिस्थिती निवळल्यानंतर ५-६ वर्षांनी हे पोलंडवासी मायदेशी परतले; मात्र कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने केलेले साहाय्य पोलंडवासी विसरले नाहीत. छत्रपती घराण्याच्या सन्मानार्थ त्यांनी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे कोल्हापूर स्मारक उभारले. काही वर्षापूर्वी पोलंडने कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील संभाजीराजे छत्रपती यांना पोलंडला विशेष अतिथी म्हणून बोलावले होते. पोलंडने संभाजीराजेंचा सन्मानही केला होता.