फोंडा, गोवा येथील पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (सनातनचे ९६ वे विकलांग संत, वय ३३ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या आईला जाणवलेली सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आधारयुक्त बोलण्यामुळे काळजी दूर होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘पूर्वीपासून ‘काळजी करणे’ हा माझा तीव्र स्वभावदोष होता. आम्ही गोवा येथे स्थलांतरित झाल्यावर ‘आमचे पुढे कसे होणार ?’, अशी मला सतत काळजी वाटायची. एकदा मी आणि माझे यजमान (श्री. गुरुदास कुलकर्णी) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना भेटलो. तेव्हा त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘तुम्ही पुष्कळ काळजी करता. तुम्ही एवढी काळजी करू नका.’’ त्यांच्या या आधारयुक्त बोलण्याने आमचे काळजी करणे अल्प झाले. आता आम्ही निश्चिंत झालो आहोत.’

– सौ. सुजाता कुलकर्णी (१६.१.२०२४)

१. संतांची सेवा त्यांना विचारून केल्यामुळे सेवेत सुसूत्रता येऊन आनंद मिळणे

पू. संकेत गुरुदास कुलकर्णी

‘सध्या पू. संकेतदादांची सेवा करतांना आम्ही त्यांना पूर्वकल्पना देऊन आणि नियोजन करूनच त्यांची सेवा करतो. त्यामुळे आमची घरची कामे आणि सेवा यामध्ये कुठेही घाई गडबड होत नाही. आता आमच्या सेवेत सुसूत्रता आली आहे. त्यांच्या वैयक्तिक कृती, उदा. दात घासणे, जेवण करणे, अंघोळ घालणे, कपडे पालटणे आम्ही त्यांना विचारून करतो. त्यामुळे आम्हाला संतसेवा करतांना आनंद मिळत आहे.

२. आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचे औषधोपचार आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेले नामजपादी उपाय यांमुळे पू. संकेतदादांचे शारीरिक त्रास उणावून त्यांचा उत्साह वाढणे

सौ. सुजाता गुरुदास कुलकर्णी

पू. संकेतदादांना नेहमीच जंतुसंसर्ग होतो. त्यामुळे त्यांच्या लघवीला दुर्गंधी येते. तसेच त्यांना अपचन होणे, उलट्या होणे, जेवण न जाणे, असे त्रास होतात. आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे, तसेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपामुळे पू. संकेतदादांना पुष्कळ आराम वाटत आहे. गेल्या वर्षभरात डॉ. मराठेकाकांनी अनेकदा तपासून औषधे पालटून दिली. याचाही पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला. सध्या पू. संकेतदादा उत्साही असतात.

३. पू. संकेतदादांनी नामजप केल्यामुळे कुटुंबियांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगल्या पद्धतीने आणि गतीने होणे

सध्या पू. संकेतदादा सकाळी सर्व आवरल्यावर जपमाळ घेऊन नामजप करत असतात. ते दुपारी न झोपता नामजप करतात. ते रात्री झोपण्यापूर्वी श्रीकृष्णाला प्रार्थना करतात आणि नामजप करूनच झोपतात. त्यांनी नामजप केल्यावर आमच्या भोवती पांढरे वलय निर्माण होऊन आम्हाला चांगली झोप लागते. आम्हाला निरर्थक स्वप्ने पडणे बंद झाले आहे. आमची शारीरिक क्षमता वाढून घरच्या कामांचा वेग वाढला आहे. आमची व्यष्टी साधनाही चांगल्या पद्धतीने आणि गतीने होत आहे. तसेच आमची समष्टी साधनाही भगवंताच्या कृपेनेच घडत आहे.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे

पू. संकेतदादा देवघरात एकटे बसून गुरुदेवांशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी) छान बोलतात. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर वेगळेच भाव असतात. ते काय बोलतात, ते मला नीट ऐकू येत नाही; पण त्यांचे बोलणे ‘ऐकत रहावे’, असे वाटते. त्या वेळी आम्हाला आध्यात्मिक लाभ होतात. गुरुदेवांशी बोलतांना ते कधी छान हसतात, तर कधी त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वहातात.

‘हे विष्णुस्वरूप गुरुदेवा, पू. संकेतदादांकडून मला आज्ञापालन, संयम, शांतता आणि स्थिरता यांविषयी शिकायला मिळाले. तसेच आपणच ही सूत्रे लिहिण्याची प्रेरणा देऊन लिहून घेतली. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सुजाता गुरुदास कुलकर्णी (पू. संकेत कुलकर्णी यांची आई), ढवळी, फोंडा, गोवा. (१६.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक