जम्मू-काश्मीर : २०० हून अधिक पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर !

३३ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे दिनांक घोषित करण्यात आले आहेत. त्याआधीच पोलीस आणि सामान्य प्रशासन विभागातील २०० हून अधिक अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्यात आले. १५ ऑगस्टच्या रात्री उशिरा सामान्य प्रशासन विभागाने ८९ जणांच्या स्थानांतरांचा आदेश दिला. यामध्ये पूंछ आणि बांदीपोरा जिल्ह्यांतील उपायुक्त, सचिव, आयुक्त, महासंचालक, व्यवस्थापकीय संचालक आणि अन्य अनेक विभागांचे संचालक यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया करण्यामागील उद्देश हा कोणताही अधिकारी त्याच्या गृहजिल्ह्यात पदावर राहू नये. तसेच त्याने कोणत्याही एका पदावर २ वर्षांपेक्षा अधिक काळ घालवला नसावा.


नलिन प्रभात यांची जम्मू-काश्मीरचे विशेष पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे महासंचालक आर्.आर्. स्वेन हे ३० सप्टेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर १ ऑक्टोबरला प्रभात नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त होतील. यासह पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, वरिष्ठ पोलीस अधीक्षक अशा ३३ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्यात आले आहे.