Japan PM Resigning : महागाईमुळे जपानचे पंतप्रधान पायउतार होणार !

भविष्यात पंतप्रधानाची निवडणूक न लढवण्याचाही निर्णय !

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा

टोकिया (जपान) – महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या पाहू शकत नसल्याचे सांगत जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी स्वत: पंतप्रधानपद त्यागण्याचा निर्णय घेतला. महागाई दर गगनाला भिडला असून लोकांचा राग वाढत आहे. हे सर्व मी पाहू शकत नाही, असे ते म्हणाले. ते पुढील महिन्यात पदत्याग करणार असल्याचेही त्यांनी घोषित केले आहे. यासमवेत ‘मी यापुढे कधीही पंतप्रधानाची निवडणूक लढणार नाही’, अशी घोषणाही किशिदा यांनी केली आहे.

१. किशिदा यांनी म्हटले की, राजकारण हे जनतेच्या विश्‍वासाखेरीज चालू शकत नाही. देशाच्या राजकारणात सुधारणा व्हायला हवी. वर्ष २०२१ मध्ये किशिदा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या कारकीर्दीत जपानची अर्थव्यवस्था ढासळली. अशातच त्यांच्या पक्षावर काळे धन जमवल्याचा आरोप झाल्याने किशिदा यांच्यावर चहुबाजूंनी टीका होऊ लागली.

२. कोरोनामुळे जपानमधील परिस्थिती बिकट झाली. किशिदा सरकारने पर्यायी पावले उचलली नाहीत. किशिदा यांच्या नेतृत्वात जपानने दुसर्‍या महायुद्धानंतर सर्वाधिक खर्च सैन्यावर केला. संरक्षणासाठी दुप्पट निधी दिल्यावरूनही सरकारवर दबाव वाढला होता.

नव्या पंतप्रधानासमोर असतील ही आव्हाने !

१. जनतेचा विश्‍वास संपादन करणे

२. महागाईवर नियंत्रण मिळवणे

३. चीनसमवेत चालू असलेला तणाव अल्प करण्याचा प्रयत्न करणे

संपादकीय भूमिका

अनेक वर्षांपासून भारताच्या कानाकोपर्‍यात राजरोसपणे भ्रष्टाचार चालू असतांना एका तरी राजकीय पक्षाच्या नेत्याने कधी अशी भूमिका घेतली आहे का ?