शारीरिक त्रास वाढण्यामागील कारणे

प्रतिकात्मक छायाचित्र

‘‘डॉक्टर, आमच्या वेळी हे असे त्रास होत नव्हते हो एवढे ! हिला आताच एवढे त्रास कसे काय ?’, असे रुग्ण विचारत असतात. ‘माझ्या आजीच्या सत्तरीला (वय ७० वर्षे) ती जितपत स्वास्थ्यकारक होती, तितकी माझी आई पन्नाशी (वय ५० वर्षे) आणि मी कदाचित् चाळिशीत (वय ४० वर्षे) असेन. आजकाल अगदी १०-११ वर्षाच्या मुलांपासून रुग्ण आम्लपित्त आणि ग्रहणी विकाराच्या (भूक कमी असणे, पचनाच्या तक्रारी) तक्रारी घेऊन येतात. सध्या कर्करोगाचे रुग्ण तर घराघरांत असतात. एकतर पालटणारे नैसर्गिक घटक आणि त्यातून अल्प झालेली शारीरिक कष्टाची कामे या दोन्ही कारणांनी मुख्यतः पिढी जशी जशी पुढे जात आहे, तसतसा सशक्त सकसपणा न्यून होत चालला आहे हे तर नक्कीच ! शरिराच्या विविध घटकांमुळे होत चाललेला विदाह किंवा घडत जाणारे ‘इनफ्लेमेट्री’ (क्षोभकारक) पालट यांसारखी लक्षणे अगदी सामान्यपणे दिसतात.

वैद्या(सौ.) स्वराली शेंड्ये

त्याला खालील काही कारणे आहेत

अ. पिके आणि फवारण्या

आ. मातीची सकसता आणि पालटलेली बियाणे

इ. आयुष्यकर रसायन, अशा दूध-तूप यांची भेसळ आणि रासायनिक मिसळ

ई. कोरोना महामारीनंतर न्यून झालेली मानसिक क्षमता

उ. प्रदूषक घटकांमुळे वाढत चाललेली हवेतील अम्लता आणि आजार उत्पन्न करण्याची क्षमता

ऊ. तेवढ्यापुरता पटकन आजार कमी करण्यासाठी मनाने औषध घेण्याची सवय आणि नंतरही त्या आजारावर काम न करणे

मुळात जेव्हा तुम्ही अन्न, हवा आणि पाणी या मूळ गोष्टींवर अवलंबून असता तिथेच भेसळ असली की, आजारपण कुणालाच चुकत नाही, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना सुद्धा ! म्हणूनच आपली आजी जशी छान राहिली, तसे रहायला आपल्या पिढीला पुष्कळ अधिक प्रयत्न करायला हवेत हे नक्की !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (११.८.२०२४)


पावसाळ्यात ताप आल्यावर आणि तापानंतर घ्यावयाची काळजी

प्रतिकात्मक छायाचित्र

ताप आणि त्यासमवेत प्रकर्षाने सांधेदुखी, अंगावर पुरळ, तसेच लालपणा ही लक्षणे अधिक दिसत आहेत. पावसाळा असल्याने गरम गरम चमचमीत तळलेले खाण्याचा मोह, स्वाभाविक पाऊस असल्याने बाहेर जाऊन व्यायामही बंद होतो. यामुळे तुमचे शरीर आजाराला लवकर निमंत्रण देते. त्यामुळे सतत पाऊस असतांना हे पदार्थ अगदी कधीतरीच खावेत.

पाऊस थांबल्याने डासही आता वाढतील. त्यामुळे येणारे आजाराचे रुग्ण वाढले आहेत. संध्याकाळी गोवर्‍या जाळून कडुनिंब पाने, वेखंड आणि धूप कापूर याचे धूपन घरात कोपर्‍या कोपर्‍यांतून फिरवल्याचा लाभ होतो. तापातील किंवा ताप येऊन गेल्यावर येणार्‍या सांधेदुखीमध्ये तेल लावून न शेकता कोरडा शेक घ्यावा. तव्यावर कपडा टाकून त्याचा शेक किंवा ‘हिटींग पॅड’ किंवा गरम पाण्याची पिशवी यासाठी वापरता येते.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये