पणजी, ११ ऑगस्ट (वार्ता.) – राज्य सरकारच्या समाज कल्याण संचालनालयाच्या स्थानबद्धता केंद्रातून ११ ऑगस्ट या दिवशी पहाटे ३ ते ५ या कालावधीत ३ बांगलादेशी नागरिकांनी पलायन केले. केंद्राच्या छताचे पत्रे उचकटून संरक्षक भिंतीवरून उडी मारून ते पसार झाले. या प्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. महंमद हावलेदर (वय १९ वर्षे), महंमद हिलाल (वय ३५ वर्षे) आणि महंमद मरिदा (वय २५ वर्षे) अशी संशयित बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. विशेष म्हणजे म्हापसा पोलीस ठाण्याच्या शेजारीच हे स्थानबद्धता केंद्र आहे.
या तिन्ही बांगलादेशी नागरिकांना पेडणे पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात कह्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने तिघांना दोषी ठरवले होते आणि तिघांनाही ६ मासांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्यांना डिसेंबर २०२३ मध्ये म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले होते. संबंधितांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांना बांगलादेशात पाठवण्यात आले नव्हते. याविषयी गृहखात्याने बांगलादेश प्रशासनाकडे संपर्क साधला होता; मात्र त्यांच्याकडून कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याने त्यांना म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले होते.
स्थानबद्धता केंद्रातून आतापर्यंत ५ विदेशी नागरिकांनी केले आहे पलायन
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून आतापर्यंत ५ विदेशी नागरिकांनी पलायन केले आहे. यापूर्वी ३१ जानेवारी २०२० या दिवशी अमीनू कानू महंमद या नायजेरियन नागरिकाने पलायन केले होते. २ मार्च २०२३ या दिवशी डिमीट्री आलेक्झांड्रोव्ह हा रशियाचा नागरिक केंद्राच्या खोलीच्या लोखंडी जाळीचे कुलूप तोडून पसार झाला होता. यानंतर ११ ऑगस्ट या दिवशी पहाटे ३ बांगलादेशी नागरिकांनी पलायन केले आहे. अशा घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
संपादकीय भूमिकाहे प्रशासनाला लज्जास्पद ! |