साधकांना आधार देणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती दृढ श्रद्धा असलेल्या बेळगाव येथील सौ. अर्चना सुनील घनवट (वय ४३ वर्षे) !

‘श्रावण शुक्ल षष्ठी (१०.८.२०२४) या दिवशी सौ. अर्चना सुनील घनवट यांचा ४३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

सौ. अर्चना सुनील घनवट यांना त्यांच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सौ. अर्चना घनवट

१. श्री. सुनील घनवट (सौ. अर्चना यांचे यजमान), पुणे

श्री सुनील घनवट

१ अ. गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवून परिस्थिती स्वीकारणे आणि स्वतः नोकरी करून यजमानांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी साहाय्य करणे : ‘काही वर्षांपूर्वी मला काही कारणास्तव नोकरी करत साधना करावी लागणार होती. त्या वेळी मला सुचलेला  ‘सौ. अर्चनाने नोकरी करायची आणि मी पूर्ण वेळ साधना करायची’, हा विचार गुरुमाऊलीला (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) सांगितला. तेव्हा ते माझ्या पत्नीला (सौ. अर्चनाला) म्हणाले, ‘‘तुला हे चालेल ना ? चि. पार्थला (मुलाला) सांभाळणे, ही पण तुझी साधना आहे.’’ तेव्हा अर्चनाने गुर्वाज्ञा शिरोधार्य मानून त्याच आठवड्यात नोकरी शोधली आणि मला पूर्णवेळ साधना करण्यास सांगितले. त्या वेळी पार्थ केवळ साडेतीन मासांचा होता. तिने गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवून परिस्थिती स्वीकारली. तिने साधना आणि सेवा यांचे प्रयत्न चालू ठेवले.

१ आ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या प्रती भाव : अर्चनाची सद्गुरु स्वाती खाडये यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. ‘सद्गुरु स्वातीताईंच्या कृपेने माझा (सौ. अर्चना यांचा) आध्यात्मिक त्रास न्यून झाला आहे. गुरुमाऊलींनी माझ्या उद्धारासाठी सद्गुरु स्वातीताईंना पाठवले आहे. त्यामुळे त्या सांगतील ती कृती तत्परतेने करणे, ही माझी साधना आहे. सद्गुरु ताई आपल्यासाठी पुष्कळ करतात; पण मीच साधनेचे प्रयत्न करण्यास न्यून पडते’, असा अर्चनाचा भाव आहे.

१ इ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : पूर्वी अर्चनाला तीव्र आध्यात्मिक त्रास होता. तिच्याकडे महत्त्वाच्या सेवा होत्या, तरीही ती नामजपादी उपाय आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने पूर्ण करत असे.

१ ई. दायित्व साधकांनी सांगितलेले मनापासून स्वीकारणे : वर्ष २००६ ते २०१९ या कालावधीत अर्चनाने पुणे येथे सेवा आणि साधना केली. नंतर दायित्व साधकांनी तिला सांगितले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा करण्यासाठी जायचे आहे.’’ तेव्हा तिच्या मनात कुठलाच विकल्प आला नाही. ‘माझी (अर्चनाची) जेथे प्रगती होणार आहे, तेथे गुरु मला (अर्चनाला) सेवेसाठी पाठवतात’, असे तिला वाटले आणि तिने कृतज्ञता व्यक्त केली. तिने लगेच सर्व सिद्धता करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा चालू केली.

१ उ. साधकांना आधार देणे : अर्चना सहसाधकांना पुष्कळ साहाय्य करते. ‘सहसाधक गुरुदेवांचे साधक आहेत आणि त्यांची साधना होण्याचे दायित्व स्वतःकडे आहे. साधकांनी गुरुकार्यासाठी त्याग केला आहे’, असा भाव ठेवून अर्चना साधकांना साहाय्य करते. साधकांना अर्चनाचा आधार वाटतो आणि अल्पावधीतच गुरुकार्याची घडी बसते. अर्चना साधकांना साहाय्य करण्यासाठी सद्गुरूंचे साहाय्य घेते.

१ ऊ. कुटुंबियांना साधनेसाठी साहाय्य करणे : पूर्वी अर्चनाच्या आई-वडिलांचा साधनेला विरोध होता. अर्चनाने त्यांना गुरुदेवांची महती आणि साधनेचे महत्त्व सांगितले. त्यामुळे त्यांच्यात पालट होऊन तेही साधना करत आहेत. त्यांची गुरुदेवांवर श्रद्धा वाढली आहे. त्यांना अनुभूती येत आहेत.

१ ए. तत्त्वनिष्ठ : अर्चना तत्त्वनिष्ठ राहून आम्हाला (मला आणि मुलगा पार्थ याला) आणि साधकांना चुका सांगते. ती आम्हाला मानसिक स्तरावर साहाय्य न करता आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करते.

१ ऐ. गुरूंच्या कृपेने समष्टी साधना करणे : सध्या अर्चना बेळगाव येथील सेवाकेंद्रात राहून सेवा करत आहे. ती प्रसाद आणि महाप्रसाद बनवणे, सत्संग घेणे, साधकांचे आढावे घेणे, साधकांना भेटणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे, अशा अनेक सेवा करत आहे. ‘गुरुच तिला आध्यात्मिक बळ देत आहेत’, असे मला वाटते.

१ ओ. ‘तिच्यात शरणागतभाव वाढला आहे’, असे मला जाणवते.’

२. कु. पार्थ घनवट (सौ. अर्चना यांचा मुलगा, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. पार्थ घनवट

२ अ. जवळीक साधणे : ‘माझी आई साधकांशी जवळीक साधून त्यांना आपलेसे करून घेते. वयस्कर साधिकाही तिच्याशी मैत्रिणीप्रमाणे बोलतात.

२ आ. स्वतःला पालटण्याची तळमळ : आई आम्हाला सांगत असे, ‘‘मला (आईला) व्यष्टी साधनेच्या आढाव्यात अमुक स्वभावदोषांवर मात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले आहेत. तुम्ही मला साहाय्य करा. माझ्याकडून चुका होत असल्यास मला त्याची जाणीव करून द्या.’’

२ इ. आईमध्ये जाणवलेला पालट : मी आश्रमात साधना करण्यासाठी गेल्यावर आईला माझी पुष्कळ काळजी वाटत होती. तेव्हा तिने सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन घेतले. तिने स्वयंसूचना घेतल्या. आता तिला माझी काळजी वाटत नाही.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २.८.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक