१. बांगलादेशातील परिस्थिती भारतासाठी धोकादायक !
‘बांगलादेशमध्ये प्रचंड हिंसाचार वाढला असून अराजकता माजली आहे. परिणामी शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिले आहे. संसदेतील ८५ टक्के सदस्य हे शेख हसीना यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्याच पक्षातील कुणी पुढे आले आणि त्याने राज्यकारभार चालवला, तर ते फार चांगले होईल. तेथे खलिदा झिया आणि जनरल इर्शाद यांचे पक्ष आहेत, तसेच ‘बांगलादेश जमात-ए-इस्लामी’ हा राजकीय पक्ष आहे. हे सर्व पक्ष भारतविरोधी असून त्यांनी राज्यकारभार केला, तर तेथील हिंदू आणि भारत यांच्यासाठी फारच अडचणीचे ठरेल. याखेरीज तेथील सैन्यही बांगलादेशाची सत्ता कह्यात घेऊ शकते. ते पाकिस्तानी सैन्याप्रमाणे कारभार चालवतील. त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती भारतासाठी अतिशय धोकादायक बनली आहे.
२. शेख हसीना यांना भारतात राजकीय आश्रय
शेख हसीना यांना ढाक्यातील निवासस्थानातून हवाई दलाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आणि आगरतळा येथून देहलीला पोचवण्यात आले. हिंसाचारी आंदोलक त्यांच्या घरात घुसले आहेत. त्यांच्यापासून वाचवण्यासाठी हसीना यांना भारतात आणण्यात आले आहे. यापूर्वी श्रीलंकेतही अशीच स्थिती निर्माण झाली होती. तेथील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आक्रमण केले होते. त्यानंतर त्यांच्या पंतप्रधानांनी अन्य देशामध्ये जाऊन आश्रय घेतला होता. बांगलादेश हा भारताचा मोठा मित्र आहे. त्यामुळे त्या भारतात रहाण्याची शक्यता अधिक आहे. यासमवेतच त्या ब्रिटन किंवा इतर राष्ट्रांमध्ये आश्रय घेऊ शकतात, असेही म्हटले जाते.
३. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होणे आवश्यक !
बांगलादेशमधील परिस्थिती अत्यंत वेगाने पालटत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना बांगलादेशातील परिस्थितीविषयी स्पष्टीकरण दिले आहे. आज १० सहस्रांहून अधिक भारतीय विविध कारणांनी बांगलादेशमध्ये आहेत.
त्यात काही विद्यार्थीही आहेत. याखेरीज तेथे २ कोटींहून अधिक हिंदु नागरिक आहेत. भारताची बांगलादेशाशी साडेचार सहस्र किलोमीटरची सीमा लागलेली आहे. सर्वसाधारण परिस्थितीत शेकडो बांगलादेशी प्रतिदिन भारतात घुसखोरी करत असतात. आता तर तेथे हिंसाचार वाढून अराजकता निर्माण झाली आहे. सध्याच्या हिंसाचारात ‘अवामी लीग’चे समर्थक आणि हिंदू यांच्यावर आक्रमणे करण्यात येत आहेत. हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करण्यात येत आहे, त्यांची संपत्ती नष्ट केली जात आहे, तसेच काहींना मारलेही जात आहे. अशा भयावह परिस्थितीत तेथील हिंदू आणि आवामी लीगचे समर्थक भारताकडे पळण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे बांगलादेशातून भारतात घुसखोरी वाढून ईशान्य भारत आणि बंगाल येथे मोठ्या प्रमाणात गडबड होऊ शकते. ज्या ईशान्य भारतातील बंडखोरांना पूर्वी बांगलादेशात आश्रय मिळत नव्हता, त्यांनाही आता अधिक चेव चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिस्थितीकडे भारताने अधिक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यासमवेतच भारताचे बांगलादेशच्या सैन्याशी चांगले संबंध आहेत. त्यांचे साहाय्य घेऊन तेथील भारतियांना भारताने सुरक्षितता दिली पाहिजे.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.