कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटण्यासाठी १५ ऑगस्टला उपोषण

सिंधुदुर्ग – कोकण रेल्वे प्रवाशांसाठी सोयीसुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जलद गाड्यांना थांबा मिळणे यांसह जिल्ह्यातील अनेक रेल्वेस्थानकांवरील विविध समस्या, तसेच अन्य प्रश्न यांकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ते प्रलंबित आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट या दिवशी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीच्या माध्यमातून उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाला सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले आहे.

‘सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या ४ स्थानकांचे सुशोभीकरण झाले; परंतु कोकण रेल्वे प्रशासन आणि बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव यांमुळे सांडपाणी निचरा, विद्युतीकरण, फलाटांवरील सुविधा यांपासून सर्वच स्थानके वंचित आहेत. (रेल्वे प्रशासनाने स्थानकांचे सुशोभिकरण करण्यासह प्रवाशांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे ! – संपादक) सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अंदाजे ८ लाख ५८ सहस्र असून जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत. कणकवली, वैभववाडी, कुडाळ आणि सावंतवाडी या ४ तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या स्थानकांसह १० स्थानके या मार्गावर आहेत. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या स्थानकांवर बहुतांश गाड्यांना थांबा मिळत असून उर्वरित ७ स्थानकांवर किरकोळ गाड्या थांबतात. रत्नागिरी जिल्हा आणि गोवा राज्य येथे असलेल्या रेल्वेस्थानकांवर चांगल्या सोयीसुविधा दिल्या जातात; मग गेल्या २५ वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय का केला जात आहे ? याचा जाब विचारण्यासाठी आणि येथील समस्या सुटण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे, असे पावसकर यांनी सांगितले.