नवी मुंबई – ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या विरोधात नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. ६ ऑगस्टला याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे. या याचिकेत १४ ऑगस्टला वितरित करण्यात येणारा योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना चालू केली आहे. ही भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आमीष दाखवण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्यामुळे निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही’, असे याचिकाकर्त्याने सांगितले आहे.
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ म्हणजे जनतेची फसवणूक आहे. २ महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
योजनेसाठी मराठीतील अर्ज ग्राह्य !
मुंबई – योजनेसाठी मराठी भाषेतून करण्यात आलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, असा अपप्रचार करण्यात आला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जांचा विषय चर्चेला आला होता. ही तांत्रिक अडचण संबंधित अधिकोषाकडून सोडवण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषेतील अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ चालू !
मुंबई – योजनेच्या अंतर्गत अर्ज भरण्यासाठी आणखी एक संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे. यापूर्वी नारी शक्तीदुत अॅपवरून अर्ज केले असतील, त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावरून अर्ज करू नये.