इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची चेतावणी
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलसमोर आव्हानात्मक दिवस आहेत; पण कोणत्याही आक्रमणाला आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ. आम्हाला बैरूतकडून धमक्या देण्यात येत आहेत. आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहोत. जो कुणी आमच्या देशाची हानी करेल, तसेच आमच्या नागरिकांची हत्या करेल, त्याला आम्ही धडा शिकवू. त्याचा हिशेब पूर्ण करू, अशी चेतावणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली. तथापि नेतान्याहू यांनी या वेळी हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येचा कोणताही उल्लेख केला नाही. इस्रायलने अद्याप हानिया याला ठार मारल्याचा दावा केलेला नाही किंवा या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचा इतरांनी केलेला आरोप फेटाळलाही नाही.
नेतान्याहू पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांत देशाने शत्रूंना मोठा धक्का दिला आहे. ३ आठवड्यांपूर्वी आम्ही हमासचा सैन्यदल प्रमुख महंमद डेफ याच्यावर आक्रमण केले होते. २ आठवड्यांपूर्वी आम्ही हुती बंडखोरांवर आक्रमण केले, जे आमच्या वायू दलाने केलेले सर्वांत मोठे आक्रमण होते. नुकतेच आम्ही हिजबुल्लाचा सैन्य प्रमुख फौद शुक्र याच्यावर आक्रमण केले.