आज्ञापालन करणारे आणि सेवेची तळमळ असलेले धुळे येथील श्री. किशोर अग्रवाल (वय ६९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. किशोर अग्रवाल

धुळे – येथे गुरुपौर्णिमेनंतर साधकांसाठी सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक साधकांनी ‘गुरुपौर्णिमेच्या काळात सेवा केल्याने कसा आनंद मिळाला’, याविषयी अनुभवलेली सूत्रे सांगितली. श्री. किशोर अग्रवाल यांनीही यासंदर्भात सूत्रे सांगितली. त्या वेळी ‘आज्ञापालन आणि सेवेची तळमळ या गुणांमुळे धुळे येथील श्री. किशोर अग्रवाल हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत’, अशी आनंदवार्ता सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी दिली. या वेळी उपस्थित सर्वांचीच भावजागृती झाली.

सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले, श्री. अग्रवालकाका हे काही दिवसांपूर्वी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शिबिराला गेले होते. तेथून त्यांनी व्यष्टी साधना शिकून घेतली. त्यानुसार कृती केली. प्रयत्नांमुळे त्यांच्यातील ‘राग येणे’ हा दोष न्यून झाला. कुटुंबातील वयाने लहान असणार्‍यांची ते क्षमायाचना करायचे. धर्मकार्य करण्याच्या तळमळीमुळेच त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती झाली.

श्री. किशोर अग्रवाल ( उजवीकडे ) यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करतांना श्री. दत्तात्रेय वाघुळदे

श्री. किशोर अग्रवाल यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. किशोर अग्रवाल यांचे वय ६९ वर्षे असूनही त्यांना साधना आणि धर्मकार्य यांची पुष्कळ तळमळ आहे. त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. कु. रागेश्री देशपांडे, नाशिक (पूर्वी धुळे येथे वास्तव्य .)

१ अ. जवळीक करणे : ‘श्री. किशोर अग्रवाल यांची धुळे येथे सर्वच क्षेत्रांतील लोकांशी चांगली ओळख असून त्यांच्याशी चांगली जवळीक आहे. ते सर्वांशीच आपलेपणाने वागतात.

१ आ. वेळेचा सदुपयोग करणे : ते स्वतःचा अधिकाधिक वेळ धर्मकार्य, सेवा, सत्संग, उपासना किंवा इतरांना साहाय्य करणे यांत घालवतात होते.

१ इ. इतरांना साहाय्य करणे  

१ इ १. कोरोनाच्या काळात रुग्णसेवा करणे : कोरोनाच्या काळात धुळे येथे ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांसाठी विनामूल्य ‘आयुर्वेदिक उपचार केंद्र’ चालू करण्यात आले होते. तिथे ते रुग्णसेवा करण्यासाठी जात होते.

१ इ २. रुग्णाईत धर्मप्रेमी व्यक्तीला पुष्कळ साहाय्य करणे : धर्मकार्यात पुढाकार घेणार्‍या एका व्यक्तीला अंतिम टप्प्याचा कर्करोग झाला होता आणि ती मरणासन्न अवस्थेत होती. तिची आर्थिक स्थितीही बिकट होती. बाहेर सर्वत्र कोरोनाचे वातावरण होते. त्या व्यक्तीच्या घरात केवळ त्या व्यक्तीची वृद्ध रुग्णाईत आई होती. तेव्हा अग्रवालकाका नियमितपणे त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना भेटून आधार द्यायचे आणि त्यांना जेवणाचा डबा देणे, वैद्यकीय साहाय्य मिळवून देणे, असे त्यांना शक्य होईल, तेवढे सर्व प्रकारचे साहाय्य करत होते.

१ ई. स्थिर असणे : त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग किंवा अडचणी आल्या, तरी ते इतरांकडे कधी त्यांच्या अडचणींविषयी सारखे सांगत नाहीत. ते आलेली परिस्थिती आणि अडचणी स्वीकारून स्थिर अन् आनंदी रहातात.

१ उ. धर्मकार्याची तळमळ : ते धुळे येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संस्था यांच्या धार्मिक अन् सामाजिक कार्यात सहभागी होतात. धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या तरुण हिंदुत्वनिष्ठ किंवा धर्मप्रेमी यांच्या समवेत ते कुठलेही कठीण कार्य करण्यासाठी मागे-पुढे पहात नाहीत.

१ ऊ. सेवेची तळमळ

१ ऊ १. देहबुद्धीत न अडकता झोकून देऊन सेवा करणे : ते स्वच्छतेच्या किंवा कुठल्याही सेवेसाठी नेहमीच सिद्ध असतात. ‘मी वयाने मोठा आहे, मला शारीरिक मर्यादा आहेत, मला जमेल का ?’, ‘ऊन किंवा थंडी यांचा काही त्रास होईल का ?’, असा देहबुद्धीचा विचार त्यांच्या मनात नसतो. ‘नवरात्री आणि महाशिवरात्री’ या काळात ते दिवसभर ग्रंथप्रदर्शन कक्षात थांबून सेवा करतात. त्यांची कितीही वेळ सेवेसाठी उभे रहाण्याची सिद्धता असते.

१ ऊ २. पुढाकार घेऊन सेवा करणे : धुळे येथे ग्रंथप्रदर्शन सेवेसाठी सर्व साधक बाहेर गावाहून आले होते. तेव्हा त्यांना लागणारे साहाय्य, उदा. ‘पाणी, सुटे पैसे, तंबू उभा करण्याचे साहित्य’, अशी सर्व व्यवस्था करून देण्यासाठी अग्रवालकाका यांचा पुढाकार होता.

१ ऊ ३. सेवेसाठी परिस्थितीशी सहजतेने जुळवून घेणे : त्यांची सेवेसाठी कुठेही जाण्याची आणि रहाण्याची सिद्धता असते. ते ब्रह्मपूर आणि अमळनेर येथे ग्रंथप्रदर्शन, तसेच जळगाव, नंदूरबार आणि धुळ येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा येथे सेवेला आले होते. बाहेर सेवेला गेल्यावर ते तेथील जेवण, निवास-व्यवस्था इत्यादी सर्व परिस्थितीशी जुळवून घेतात.

१ ए. साधनेची तळमळ : त्यांना साधनेत आलेल्या अडचणी किंवा प्रश्न आणि त्यांच्या मनातील सर्व विचार ते उत्तरदायी साधकाला सांगतात अन् त्यावर ‘प्रयत्न कसे करायचे ?’, हेही ते विचारून घेतात.

१ ऐ. अंतर्मुख असणे : ते नेहमी अंतर्मुख असतात. ते कधीच इतरांची निंदा किंवा इतरांवर टीका करत नाहीत किंवा कुणाची कुणाशी तुलनाही करत नाहीत.

१ ओ. अहं अल्प असणे

१. त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आमच्यासारख्या साधकांनी त्यांना काहीही सांगितले, तरी ते लगेच स्वीकारतात.

२. ते करत असलेल्या सेवा किंवा धर्मकार्य यांविषयी कधी कुणाला सांगत नाहीत. त्यांविषयी त्यांच्या मनामध्ये कुठेही कर्तेपणा नसतो.’

२. सौ. आनंदी वानखेडे, अमरावती

२ अ. प्रेमळ : ‘श्री. अग्रवालकाका सेवाकेंद्रात येतांना सर्वांसाठी खाऊ घेऊन येतात आणि अधूनमधून माझी मुलगी कु. अन्वीसाठी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४ वर्षे) चॉकलेटही आणतात. ते त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांसाठी सेवाकेंद्रातील साधकांना आमंत्रित करतात. काही कारणाने त्यांच्या घरी गेल्यावर ते आम्हाला खाऊ देतात.

२ आ. साधनेची तळमळ असणे : ते रामनाथी (गोवा) आश्रमात झालेल्या साधना शिबिरात सहभागी झाले होते. शिबिराहून परत आल्यानंतर त्यांनी व्यष्टी साधनेचे (टीप २) सर्व प्रयत्न समजून घेतले. त्यांनी ‘सारणीत स्वभावदोष आणि अहं यांच्या चुकांचे लिखाण कसे करायचे’, हे शिकून घेतले. त्यानुसार ते चुकांचे लिखाण करून सारणी घेऊन सेवाकेंद्रात मला दाखवायला आणतात.

(टीप २ नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भावजागृतीचे प्रयत्न, क्षमायाचना आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करणे)

२ इ. आज्ञापालन : व्यष्टी साधनेतील ‘क्षमायाचना’ हा भाग सांगितल्यावर त्यांनी कुटुंबियांची क्षमा मागायला आरंभ केला. या वयामध्ये आणि स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्यांची क्षमा मागणे पुष्कळ कठीण असते; पण तसे करायला सांगितल्यावर त्यांनी लगेच कृती केली.

२ ई. समष्टी सेवेची पुष्कळ तळमळ असणे : श्री. अग्रवालकाकांमध्ये समष्टी सेवेची पुष्कळ तळमळ आहे. ते राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी पुष्कळ जागरूक असतात. स्थानिक स्तरावर ज्या काही अयोग्य गोष्टी त्यांच्या लक्षात येतात, त्यासाठी ते पुढाकार घेऊन त्यावर उपाययोजना काढतात.’

३. कु. श्रुती शिरसाट, नाशिक

३ अ. वक्तशीरपणा : ‘श्री. अग्रवाल कुठलाही सत्संग किंवा उपक्रम येथे वेळेत उपस्थित रहातात.

३ आ. व्यष्टी साधनेची तळमळ : त्यांनी भ्रमणभाषवर प्रत्येक १५ मिनिटांनी प्रार्थनेचा गजर लावला आहे. ते कुठेही असले, तरी गजर वाजल्यावर लगेच प्रार्थना करतात.

३ इ. श्री. अग्रवालकाका यांचा चेहरा तेजस्वी दिसत असून त्यांच्या चेहर्‍याकडे बघून शांत वाटते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ९.११.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक