नवी मुंबई – आता गांधीवाद पुष्कळ झाला. पाकिस्तानला ‘एक गालावर मारले, तर दुसरा गाल पुढे करावा’, या गांधीवादाने नव्हे, तर ‘जशास तसे’ उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी वाशी येथे केले. ते ‘जम्मू-काश्मीर डोगरा समाज ट्रस्ट’च्या वतीने २६ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘कारगिल विजय दिवस’ या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर कर्नल अमरजित सिंग वधावन, भाजपचे आमदार गणेश नाईक, नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, ‘जम्मू-काश्मीर डोगरा समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष कृष्णा पंडित, निधी डोगरा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी पुढे म्हणाले की,
१. ही वीर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे. मोगलांना इंग्रजांनी नव्हे, तर आपल्या पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य राजांनी युद्ध करून पळता भुई थोडी केली होती. हा देश पराक्रमी शूरविरांचा आहे.
२. वर्ष १९७१ च्या युद्धात आपण १३ दिवसांत पाकिस्तानचे २ तुकडे केले. तोच आता आपल्यावर पुन्हा डोळे वटारत आहे. आपल्याला नेहमी ‘अहिंसा परमो धर्मः’, असे सांगितले जाते; परंतु हे अर्धे वचन असून पूर्ण वचन ‘अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैवच’ असे आहे. तथापि हे सांगितले जात नाही. ते सांगायला हवे. मुलांना लढण्यास शिकवले पाहिजे.
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी आणि पुलवामा आक्रमणाच्या घटनांनंतर जी कारवाई केली, तशी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानला शांततेची भाषा समजत नाही. मागील ७५ वर्षे आपण अन्याय सहन करत आलो आहे. आता योग्य संधी आली आहे. पाकिस्तानचे ४ तुकडे करावेत.
सध्याच्या पिढीला ‘कारगिल विजय दिवस म्हणजे काय ?’, हे समजण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ! – कृष्णा पंडित
कृष्णा पंडित म्हणाले की, आम्ही डोगरा असल्याचा आम्हाला अभिमान आहे. सध्याच्या पिढीला ‘कारगिल विजय दिवस म्हणजे काय ?’, हे समजण्यासाठी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.
सैन्यामध्ये डोगरा समाजाचे योगदान महत्त्वाचे ! – आमदार गणेश नाईक
भाजपचे आमदार गणेश नाईक म्हणाले की, सैन्यामध्ये डोगरा समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे. कारगिलमध्ये बिकट परिस्थितीत सैनिकांनी युद्ध केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश बलशाली बनणार आहे. एकाच देशात दोन कायदे चालणार नाहीत, हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करत काश्मीरविषयी स्तुत्य निर्णय घेतला आहे.
आमची चौथी पिढी सैन्यात आहे ! – कर्नल अमरजित सिंग वधावन
कर्नल अमरजित सिंग वधावन म्हणाले की, आमची चौथी पिढी सैन्यात आहे. सैन्यात जाण्यासाठी लहानपणापासून संस्कार असावे लागतात.