सांगली, २७ जुलै (वार्ता.) – कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फूट ३ इंच, तर मिरज येथील कृष्णा घाटावर नदीची पातळी ५२ फूट ४ इंच पोचली आहे. काळजी म्हणून सैन्याची एक तुकडी सांगली येथे आली आहे, तसेच नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. २६ जुलैच्या रात्री जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिकेचे आयुक्त यांनी सैन्याच्या तुकडीच्या अधिकार्यांसमवेत कृष्णा नदीच्या पाणीपातळीचा आढावा घेतला. आजही पश्चिमेकडील ४ तालुक्यांतील शाळांना सुटी घोषित केली आहे. सांगली शहरात पुराचे पाणी शिरण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे उपकरणांसह सैन्याचे पथक येथे आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सतत पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यांमुळे कृष्णेच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन सतर्क झाले असून ‘एन्.डी.आर.एफ्.’चे पथक जिल्ह्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. भारतीय सैन्य, एन्.डी.आर्.एफ्. आणि महापालिकेचे अग्नीशमनदल यांनी पूर भागात ‘मॉक ड्रिल’ करून आढावा घेतला आहे. ( ‘मॉक ड्रील’ म्हणजे भविष्यातील आपत्तीजनक घटना किंवा आता समोर असलेली समस्या टाळण्यासाठी अंदाज घेऊन आधीच प्रयोग करून पहाणे.) सध्या पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि महापालिका प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आहेत.
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन माहिती घेतली. महापालिकेने केलेल्या कामकाजाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. आयुक्त शुभम गुप्ता यांनी ‘पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत’, अशी माहिती दिली.