बजरंग दलाने माळीवाड्यात कार्यक्रम घेतला !
छत्रपती संभाजीनगर – विहिंप, बजरंग दल, स्वराज्य तोरणा प्रतिष्ठान आदी संघटनांनी २५ जुलै या दिवशी दौलताबाद (देवगिरी) गडावर आयोजित स्वराज्य प्रेरणादिनाच्या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाने अनुमती नाकारली, तरीही बजरंग दल संघटनांचे कार्यकर्ते सकाळी दौलताबाद परिसरात जमा होऊन त्यांनी स्वराज्य स्तंभ उभारणीचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहून कार्यकर्ते तेथून निघून गेले आणि माळीवाड्यात कार्यक्रम घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील गजापूर घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती असल्याने पोलिसांनी दौलताबाद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पुरातत्व विभाग आणि पोलीस यांनी आधीच अनुमती नाकारली, तरीही सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विहिंपचे देवगिरी प्रांतप्रमुख श्री. संजय बारगजे, भाजपचे श्री. संजय केणेकर, ह.भ.प. मेटे महाराज, श्री श्रवण चैतन्य महाराज, श्री सुदर्शन महाराज, नेताजी पालकर यांचे वंशज विक्रम पालकर, मनीष पाटील, राहुल भोसले, अशोक मुळे, उद्धव ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यासह ४०० हून अधिक कार्यकर्ते दौलताबाद येथे जमा झाले. कार्यकर्त्यांनी जमावे म्हणून ५ दिवसांपूर्वी हेडगेवार रुग्णालयातील सभागृहात एक बैठकही घेण्यात आली होती. शिवभक्तांनाही या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी सामाजिक माध्यमांवर मोहीम राबवण्यात आली होती.
दौलताबादमधील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हिंदुत्वनिष्ठांनी घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांसमवेत स्वराज्य तोरण प्रतिकृती होती; मात्र पोलिसांचा बंदोबस्त पाहून हे सर्व कार्यकर्ते वाहनांनी आणि पायी माळीवाड्यात गेले. तेथे एका सभागृहात स्वराज्य तोरण सोहळा साजरा केला. अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने अनेक उपाहारगृहचालक आणि दुकानदार यांनी सकाळी स्वतःची दुकाने बंद ठेवली होती. गड परिसरातील दुकाने मात्र चालू होती. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी आयोजक आणि पुरातत्व खाते यांच्यासमवेत आधीच समन्वय बैठक आयोजित केली होती. पुरातत्व खात्याच्या अधिकार्यांनी तेव्हा आयोजकांना गडावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकत नसल्याचे सांगितले होते.