नाशिकच्या कारागृहातून सुटलेल्या गुंडाच्या स्वागतासाठी मोठी मिरवणूक !

  • मिरवणुकीत सराईत आणि तडीपार गुंडांचा समावेश

  • एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

गुंडाच्या स्वागतासाठी काढलेली मोठी मिरवणूक

नाशिक – गंभीर गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर याची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी स्वागतासाठी शहरात मोठी मिरवणूक काढली. त्यात सराईत गुन्हेगारांसह तडीपार गुंडांचाही समावेश होता. या प्रकरणी पोलिसांनी कारागृहातून सुटका झालेला हर्षद पाटणकर याच्यासह गुंड गोपाल नागोरकर, वेदांत चाळदे, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबीन्सन बत्तिसे, वैभव खंडारे आणि विकास नेपाळी अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला, तसेच घोषणा दिल्या. रस्त्यात विनाकारण वाहनांचे हॉर्न वाजवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

शहर पोलिसांनी १०० गुन्हेगारांना तडीपार केले आहे; मात्र त्यांपैकी बहुतांश गुंड शहरातच असल्याचे आढळून आले आहे. (केवळ तडीपार करून काय उपयोग ? अशा गुंडांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक) त्यातील काही गुंडांनी तडीपारीच्या काळात शहरातच गुन्हेही केले आहेत. काही तडीपार गुंडांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

संपादकीय भूमिका

  • पोलिसांचा धाक नसल्याने गुंडांच्या अशा मिरवणुका निघतात, हे पोलिसांना लज्जास्पद !