१. सुंदर निसर्ग घडवला; म्हणून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे प.पू. डॉक्टर !
१ अ. देवाने निर्माण केलेल्या पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे : एकदा प.पू. डॉक्टरांची प्राणशक्ती उणावली होती आणि प.पू. डॉक्टरांच्या घशाला सतत कोरड पडत होती. त्या वेळी त्यांना थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यावे लागत होते. एकदा पाणी पितांना ते म्हणाले, ‘‘बरे झाले ना, देवाने पाणी दिले आहे ! पाणी नसते, तर आपले कसे झाले असते ?’’
१ आ. ईश्वराने निरनिराळे रंग निर्माण केले; म्हणून कृतज्ञता व्यक्त करणे : एकदा दोन साधिकांनी वेगवेगळ्या रंगांचे पोशाख परिधान केले होते. त्या वेळी ते पाहून प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘बरे झाले ना, देवाने वेगवेगळे रंग दिले आहेत ! त्यामुळे त्यातील आनंद घेता येतो.’’
१ इ. देवाने सुंदर वातावरण निर्माण केले; म्हणून कृतज्ञता व्यक्त करणे : सायंकाळच्या वेळेत आकाशात कधी संधीप्रकाश (पूर्ण पिवळसर केशरी छटा असलेले वातावरण) पडलेला दिसला, तर प.पू. डॉक्टर आश्रमातील सर्व साधकांना तो पहाण्यास सांगतात. ‘देवाने दिलेले वातावरण किती सुंदर आहे’, हे प्रत्येकाला कळावे, यासाठी ते पहायला सांगतात.
१ ई. झाडांना धरून ठेवणार्या भूमीतील मुळाप्रमाणे देवानेही आपल्याला धरून ठेवले असल्याचे सांगणे : एकदा प.पू. डॉक्टर त्यांच्या खोलीतून समोर दिसणार्या झाडांकडे पाहून म्हणाले, ‘‘ही झाडे पाहिलीत का ? आपल्या डोळ्यांना झाड दिसते; पण झाडांना धरून ठेवणारे भूमीतील मूळ दिसत नाही. नाही का ? आपले असेच आहे. आपल्यालाही देवाने असेच धरून ठेवले आहे ना !’’
२. साधकांविषयीही कृतज्ञता व्यक्त करणारे महान परात्पर गुरु !
२ अ. संस्थेच्या स्थापनेच्या आरंभीच्या काळात श्रद्धेने पूर्णवेळ झालेल्या साधकांप्रती कृतज्ञता वाटणे : संस्थेच्या कार्याला आरंभ झाला आणि जे साधक कोणताही आश्रम नसतांना जराही व्यावहारिक विचार न करता पूर्णवेळ साधक झाले, त्या साधकांविषयी गुरुमाऊलींना कृतज्ञता वाटते. ती त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते.
२ आ. अनेक त्रास सहन करून साधक साधना करतात; या कृतज्ञतेपोटी ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’ ही कविता लिहिणे : ‘साधक किती त्रासांमधून साधना करत आहेत ? कितीही त्रास झाला, तरी ते साधना सोडून न देता साधना करत आहेत’, या विचाराने गुरुमाऊलीला कृतज्ञता वाटत होती आणि एक दिवस त्यांच्या बोलण्यातून ती व्यक्त झाली. साधकांविषयी वाटणार्या कृतज्ञतेपोटीच गुरुमाऊलीने ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो !’, ही कविता लिहिली.
३. संतांविषयी प.पू. डॉक्टरांना वाटणारी अपार कृतज्ञता !
३ अ. सनातनला साहाय्य करणार्या संतांविषयी वाटणारी कृतज्ञता !
३ अ १. ‘संत माझ्यासाठी अनुष्ठाने करतात; म्हणून मी जिवंत आहे’, अशी कृतज्ञता गुरुमाऊलीच्या बोलण्यातून सतत व्यक्त होत असते.
३ आ. प.पू. डॉक्टरांच्याच मार्गदर्शनाखाली घडलेल्या सनातनच्या संतांप्रती त्यांचा असणारा भाव
३ आ १. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी संतपद गाठल्यानंतर त्यांना ‘पू. पिंगळेकाका’ असे संबोधणे : काही वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांना अल्प रक्तदाबाचा त्रास होत होता. त्या वेळी डॉ. चारुदत्त पिंगळेकाका (आताचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे) वैद्यकीय विभागात सेवा करत होते. त्या वेळी ते संत झालेले नव्हते. प.पू. डॉक्टर त्यांना त्रास होऊ लागल्यावर रक्तदाब पहाण्यासाठी डॉ. पिंगळेकाकांना बोलावून घेत. काका संत झाल्यावर एकदा प.पू. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी दूरभाष केला. तेथे सेवा करणार्या साधिकेने तो घेतला. प.पू. डॉक्टरांनी ‘पू. पिंगळेकाका आहेत का ? ते येऊ शकतात का ?’, असे विचारले. याविषयी एका साधिकेने विचारल्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आता ते संत झाले आहेत. त्यामुळे असे विचारायला हवे.’’
४. प.पू. डॉक्टरांना त्यांच्या गुरूंविषयी वाटणारी शब्दातीत कृतज्ञता !
४ अ. दिवसाचा प्रारंभ प्रार्थना आणि कृतज्ञता यांनी करणे
प.पू. डॉक्टरांच्या दिवसाचा आरंभ प.पू. भक्तराज महाराजांच्या (प.पू. बाबांच्या) चरणी कृतज्ञता आणि प्रार्थना करून होतो.
४ आ. प.पू. बाबांच्या चैतन्यमय आठवणी जतन करून ठेवणे
१. प.पू. भक्तराज महाराजांचा शब्दन्शब्द प.पू. डॉक्टरांनी संग्रही ठेवला आहे.
२. प.पू. डॉक्टरांनी प.पू. बाबांचे बोलणे आणि त्यांनी गायलेली भजने यांचे ध्वनीमुद्रण, ध्वनीचित्रीकरण, तसेच छायाचित्रे समष्टीसाठी जतन करून ठेवली आहेत.
३. ‘आश्रम प.पू. बाबांचा आहे’, असा प.पू. डॉक्टरांचा सनातनच्या आश्रमांविषयी भाव असतो.
४. दैनंदिन जीवनातही त्यांचा ‘प.पू. बाबांचे शिष्य आहोत’, असा विचार असतो. त्यानुसार प.पू. डॉक्टरांचे वागणे आणि बोलणे असते.
५. प.पू. बाबांनी वापरलेल्या वाहनाप्रती कृतज्ञता
आश्रमात प.पू. भक्तराज महाराजांनी वापरलेली गाडी आल्यावर प.पू. डॉक्टरांना प्रत्यक्ष प.पू. बाबा आल्याचा आनंद झाला होता. त्या वेळी ‘तिला पाहून आपण प.पू. बाबांनाच भेटत आहोत’, या विचाराने प.पू. डॉक्टरांची भावजागृती झाली.
६. गुरुपत्नी प.पू. जीजी यांनी विभूती दिल्यानंतर कृतज्ञतेने भरून येणे : एकदा प.पू. बाबांच्या धर्मपत्नी प.पू. जीजी आश्रमात आल्या होत्या. त्यांनी प.पू. डॉक्टरांसाठी आणलेली विभूती त्यांच्या हातात दिली. प.पू. डॉक्टरांनी लगेचच ती स्वतःच्या कपाळाला लावली. ‘देव आपल्यासाठी किती करतो’, या कृतज्ञतेने त्यांना भरून आले.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
कृतज्ञता सदैव राहू दे अंतरी, तरून जाण्या या भवसागरी ।
कृतज्ञतेने जगणे होऊ दे क्षणोक्षणी, अशी प्रार्थना असे तव चरणी ।।’
– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.