यंदाच्या वारीत पुणे येथे तिच्या स्वागतासाठी मुसलमानांकडून अल्लाहविषयी अभंग असलेला एक आक्षेपार्ह फलक लावला होता, तसेच दौंड येथे वारकर्यांसाठी लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या दोन्ही घटनांवर प्रकाश टाकण्यासाठी या लेखाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न !
संकलक : सौ. अपर्णा जगताप, पुणे
१. पंढरपूरच्या वारीला इस्लामी रंग देण्याचा प्रयत्न ?
सध्या महाराष्ट्राची अस्मिता, शान असलेल्या वारीत मागील काही वर्षांत ठरवून नको ते प्रकार केले जात आहेत. पुणे येथील मोती मशिदीजवळ ‘मोती मस्जिद जमात ट्रस्ट’च्या वतीने पंढरीच्या वाटेवर पायी जाणार्या सर्व वारकर्यांना १ जुलैला ‘अल्पाहार वाटप’ करण्यात येणार असा फलक लावण्यात आला होता. त्यावर ‘अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दवा अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नही कोय, अल्लाह करे सोही होय’ अभंग क्र. ३६६७ गाथा देहूची प्रत’, असे लिहिण्यात आले होते. (‘प्रत्यक्षात असा अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला नाही’, असे संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी एका ध्वनीचित्रफितीद्वारे सांगितले आहे. – संकलक) या वर्षी सासवड येथे ‘श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरखुर्मा वाटप’, असा फलक लावण्यात आला होता. हा पंढरपूरच्या वारीला इस्लामी रंग देण्याचा प्रयत्न नव्हे का ? अन्य धर्मीय लोक त्यांच्या धार्मिक आणि पारंपरिक विषयांत अन्य कोणताही हस्तक्षेप मान्य करत नाहीत. मग हिंदूंनी तरी तो का सहन करावा ?
२. वारीची परंपरा कलुषित करण्याचा प्रयत्न
दुसरे एक उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील चौफुला येथील ‘न्यू अंबिका कला केंद्रा’तील महिला लावणी कलावंतांनी वारकर्यांची जेवणाची आणि लावणी बारी पहाण्याची सोय केली होती. पंढरीची वारी वारकर्यांसाठी भक्तीचा, श्रद्धेचा आणि चैतन्याचा सोहळा असतो. पंढरपूरच्या वारीत लावणी, तमाशा कसा ठेवू शकतो ? अशा प्रकारांतून जाणूनबुजून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा आणि परंपरा कलुषित करण्याचा प्रयत्न होत आहे, हे लक्षात येते.
३. लावणीच्या माध्यमातून भक्तीसेवा ?
पालखी सोहळ्यातील वारकरी लावणीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन तेही नाचत असल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले होते. यात आता प्रश्न उपस्थित होतो की, नाचणारे खरेच वारकरी होते कि वारकर्यांना कलंकित करण्यासाठी खोटे वारकरी घुसवले होते ? हे षड्यंत्र आता खरे वारकरी आणि विठ्ठल भक्त यांनी शोधून काढायला हवे. ‘वारकर्यांच्या आनंदासाठी, त्यांचा थकवा घालवण्यासाठी लावणी साजरी केली जाते. टाळ आणि चाळ (लावणीच्या वेळी पायाला बांधायचे घुंगरू एकत्र करून एका कापडी पट्टीवर किंवा सुती दोरीने बांधले जातात, त्याला चाळ म्हणतात.) याच्या जुगलबंदीचा संगम हा येथे पहायला मिळतो’, असे ‘न्यू अंबिका कला केंद्रा’च्या संचालिकेने सांगितले. असे मानले जाते की, रात्री स्वतः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली येऊन त्यांच्या लाडक्या भक्तांच्या थकल्याभागल्या शरिरावरून मायेने हात फिरवतात. त्यामुळे भक्तांचा सगळा शीण तिथल्या तेथे नाहीसा होतो आणि भक्त दुसर्या दिवशी भल्या पहाटेच सज्ज होऊन दामदुप्पट उत्साहाने चालू लागतात ! मग अशा वेळी वारकर्यांना थकवा घालवण्यासाठी लावणीची आवश्यकता भासेल का ? वर उल्लेखलेल्या ठिकाणी अभंगासह चित्रपटातील गाणीही सादर करण्यात आली. ‘सैराट’ चित्रपटामधील ‘झिंगाट’सारख्या गाण्यावर नृत्य सादर करून कलावंतांची कोणती भक्तीसेवा झाली ? जर भक्तीसेवाच करायची होती, तर ती लावणीच्या माध्यमातून करण्यापेक्षा अन्नदान करून, अभंग वा विठ्ठलाची भक्तीगीते सादर करता आली असती. मग ती तशा स्वरूपात का सादर केली गेली नाही ?
४. वारकरी संप्रदायातील तत्त्वज्ञान
१८ व्या शतकात ह.भ.प. मल्लप्पा वासकर आणि पुढे इंग्रजांच्या काळात गुरुवर्य ह.भ.प. हैबतराव अरफळकर यांनी वारीला ऐश्वर्यसंपन्न केले. पुढे दिंडीत म्हणण्याचे अभंग, त्यांच्या चाली कशा असाव्यात ? भजनाचा प्रारंभ आणि शेवट कोणत्या अभंगाने करायचा ? अशा बारीकसारीक गोष्टींत त्यांनी शिस्त लावली. परस्त्रीला रुक्मिणी मातेसमान आणि परपुरुषाला पांडुरंगासमान मानणे, पूर्ण शाकाहार, पान-तंबाखू वर्ज्य असे अनेक दंडक वारकर्यांसाठी घालून दिले गेले. वारकरी संप्रदायातील बहुतांश लोक हे शेतकरी असतात. ते सर्वजण वारकरी संप्रदायातील तत्त्वज्ञान खर्या अर्थाने जगत असतात. विठ्ठलाच्या केवळ स्मरणाने आनंदविभोर होतात, त्यांचे डोळे भरून येतात, ते त्याच्यासाठी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून त्याच्या निमिषमात्र दर्शनासाठी आणि चरणांवर माथा टेकवण्यासाठी व्याकुळ होतात. त्यांनाच ‘वारकरी’ म्हणतात.
५. …हा तर संस्कृती संपवण्यासाठीचा प्रयत्न !
गेल्या ३२ वर्षांपासून ‘न्यू अंबिका कला केंद्रा’चा हा कार्यक्रम चालू आहे. पवित्र वारीमध्ये हा आता ‘इव्हेंट’ झाला आहे, असे यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खर्या भक्तांना आनंद हा भोगातून नाही, तर भक्तीतून मिळतो. वैष्णवांचा हा महामेळावा भक्तीमार्गात तल्लीन झालेला असतो. या काळात त्यांना कोणत्याही विवंचनेचे भान नसते. खर्या वारकर्यांना केवळ देवाच्या भेटीची ओढ असते, त्यांना देवळाच्या जवळच्या भागातही झोप लागते. एखाद्या झाडाखालीसुद्धा ते त्याच निर्लेपतेने झोपू शकतात. सकाळी विठ्ठलाच्या नामस्मरणाने नवा दिवस चालू करतांना त्यांना केवळ पांडुरंगाचे चरण दिसत असतात. अशांना चित्रपटातील गाण्यावर सादर केलेल्या लावणीतून खरा आनंद कसा मिळेल ? अन्नदान करण्यापुरते ठीक आहे; पण लावणी म्हणजे वारीचे पावित्र्य, मांगल्य नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. यालाच ‘सांस्कृतिक पतन’, असे म्हणतात. ‘इफ यू कान्ट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम’, म्हणजे ‘जर संस्कृती संपवता येत नसेल, तर संभ्रमित करून तिचे पतन करा, तिचे स्वरूप पालटा’, या नियमातून वारकर्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि काही प्रसारमाध्यमेही असल्या थिल्लर प्रकारांना जोरात प्रोत्साहन देत आहेत.
६. कीर्तनाच्या माध्यमातून जागृती करणे आवश्यक !
विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक किलोमीटरचे अंतर अथक पायी चालत जाणार्या लाखो वारकर्यांची भक्ती, भोळा भाव कलुषित करण्याचा प्रयत्न चालू आहे. याचे पावित्र्य जपणे, ते वृद्धींगत करणे, हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी कीर्तनकारांनीच आता कीर्तनाच्या माध्यमातून याविषयी जागृती करणे आवश्यक आहे. तालुक्यासारख्या ठिकाणी पुरुष आणि महिला कीर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचे कीर्तन यू ट्यूबसारख्या सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्यास, ते एक प्रभावी प्रबोधन ठरेल आणि वारीचे पावित्र्य जपले जाईल.