रामनाथी (गोवा) – सप्तर्षींच्या आज्ञेने काशी (उत्तरप्रदेश) येथील श्री धुंडीराज विनायक गणपतीला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ३ गुरूंच्या नावे पूजा करण्यात आली. ही पूजा मंदिराचे पुजारी श्री. कन्हैय्याजी यांनी केली. या वेळी श्री. कन्हैय्याजी यांनी ‘काशीमध्ये काशी विश्वनाथाला विराजमान होण्यासाठी जे अडथळे होते, ते श्री धुंडीराज विनायकाने दूर केले. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये येणारे सूक्ष्मातील अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केली.
श्री धुंडीराज विनायकाची माहिती आणि त्याचे महत्त्व !
‘काशी (उत्तरप्रदेश) येथे सहस्रो मंदिरे आहेत. त्यात गणेशाची ५६ मंदिरे आहेत. या ५६ गणेशांमध्ये श्री धुंडीराज विनायक विशेष आहे. असे म्हटले जाते की, काशीची परिक्रमा केल्यावर श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घ्यावे. काशी विश्वनाथाच्या प्रवेशद्वाराशीच हा श्री गणेश विराजमान आहे. श्री गणेशाच्या आज्ञेने राजा दिवोदास वानप्रस्थाश्रमात गेल्यानंतर भगवान विश्वकर्माने काशीक्षेत्राचे पुनर्निर्माण केले. त्यानंतर तेव्हा भगवान शिव समस्त देवगणांसह मंदाराचाल पर्वतावरून काशी क्षेत्री वास्तव्यास आले. काशी क्षेत्री ते ‘काशी विश्वनाथ’ झाले.
काशीक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर विश्वनाथांनी प्रथम श्री गणेशाची स्तुती केली. त्यांनी धुंडीराज स्तोत्राचे पठण करून सांगितले, ‘‘येथे श्री गणेश धुंडीराज नावाने प्रसिद्ध होतील. जे भक्त काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यापूर्वी धुंडीराज विनायकाचे दर्शन आणि पूजन करतील, त्याला माझा (भक्ताला विश्वनाथाचा) संपूर्ण आशीर्वाद लाभेल.’’ त्यानंतर श्री गणेश ५६ रूपांत काशीक्षेत्री विराजमान झाले.
काशी विश्वनाथ हे भक्तांना पावणारे आहेतच; पण त्यांचे काशीक्षेत्री आगमन होण्यासाठी कार्य केलेले श्री धुंडीराज गणेशही भक्तवत्सल आहेत. श्री धुंडीराज गणेशाचे दर्शन घेतल्याखेरीज काशीयात्रा पूर्ण होत नाही, असे या गणेशाचे महात्म्य आहे.’