एकदा धरलेला हात परमकृपाळू गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) कधीही सोडत नाहीत, याची चेन्नई येथील श्रीमती गीतालक्ष्मी यांनी घेतलेली अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘गेल्या २ वर्षांपासून मी सनातन संस्था, साधक, सत्संग, सेवा, नामजप या सर्वांपासून स्वतःला अलिप्त ठेवले होते.

२. वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेच्या १० दिवस आधी एकदा मी ‘यू ट्यूब’ पहात असतांना  ‘ऑनलाईन’ नामजप सत्रे घेण्यात येत असल्याचे मला दिसले.

३. यापूर्वीही ‘यू ट्यूब’ पहात असतांना मी ‘ऑनलाईन’ नामजप होत असल्याचे पाहिले होते; परंतु तेव्हा मला ‘त्यात सहभागी व्हावे’, असे कधी वाटले नाही. या वेळी मात्र ‘नामजप सत्रामध्ये आपण सहभागी होऊया’, असे मला आतून वाटले.

४. नंतर मी ‘ऑनलाईन’ नामजप सत्रांना उपस्थित राहू लागले आणि मला चांगले वाटू लागले.

५. ‘ऑनलाईन’ नामजप सत्रांना नियमित उपस्थित राहिल्याने आलेल्या अनुभूती

श्रीमती डी. गीतालक्ष्मी

५ अ. नामजप करतांना ईश्वरी शक्ती जाणवून देहाभोवती संरक्षककवच सिद्ध होत असल्याचे जाणवणे : या सत्रात नामजप करतांना एकदा मला ईश्वरी शक्ती जाणवली. त्या वेळी ‘उर्ध्व दिशेकडून ईश्वरी शक्तीचा प्रवाह माझ्या डोक्याकडे प्रवाहित होत आहे आणि नंतर तो प्रवाह माझ्या संपूर्ण देहात प्रवाहित होऊन माझ्या देहाभोवती एक संरक्षक कवच सिद्ध होत आहे’, असे मला जाणवले.

५ आ. नामजप आपोआप चालू होणे आणि यातून श्रद्धा अन् कृतज्ञताभाव वाढणे : या अनुभूतीमुळे मी प्रतिदिन या ‘ऑनलाईन’ नामजप सत्रांना उपस्थित रहाण्याचे ठरवले. ‘ऑनलाईन’ नामजप सत्रांना ४ दिवस सलग उपस्थित राहिल्यानंतर एक दिवस मी असेच चालत असतांना माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप आतून आपोआप होत असल्याचे माझ्या लक्षात आले. कित्येक वर्षांनी माझा असा आपोआप नामजप होऊ लागला होता. या अनुभूतीमुळे माझी श्रद्धा वाढून मन कृतज्ञतेने भरून आले.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुन्हा साधनेत आणून केलेली कृपा !

६ अ. गुरुपौर्णिमेनिमित्त असलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे आणि सेवेत सहभागी होण्याची संधी लाभणे : नंतर २ दिवसांनी मला श्री. बालाजी कोल्ला (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना संपर्क करण्याचा निरोप मिळाला. मी त्यांना भ्रमणभाषवर संपर्क केल्यावर त्यांनी मला गुरुपौर्णिमेनिमित्त असलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. ते मला म्हणाले, ‘‘तुमची इच्छा असल्यास तुम्ही गुरुपौर्णिमेच्या काही सेवांमध्येही सहभागी होऊ शकता.’’ त्यानुसार संबंधित साधकांना मी संपर्क केला आणि मला गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या वेळी तेथील स्वागतकक्षात सेवा करण्याची संधी मिळाली.

६ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पुन्हा नामजप, सत्संग, सत्सेवा यांना आरंभ होणे : ‘अल्पावधीत माझ्यासाठी किती विस्मयकारक गोष्टी घडल्या आहेत’, याची मला जाणीव झाली. नामजप करण्यास आरंभ करणे, साधकांशी जोडले जाणे, सत्संगात एकत्र येणे आणि सत्सेवेत सहभागी होणे, हे सर्व प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला पुन्हा मिळाले. इतके दिवस मी या सर्व अनमोल गोष्टींपासून दूर पळत होते. प.पू. गुरुदेवांनी त्या  पुन्हा सहज घडवून आणल्या. गुरुकृपेला मर्यादा नसते. प.पू. गुरुदेवांचाच हा महिमा आहे. प.पू. गुरुदेवांप्रती कोटी कोटी कृतज्ञताभावाने माझे हृदय भरून आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोमल चरणकमली संपूर्ण शरणागतीने समर्पित !’

– श्रीमती डी. गीतालक्ष्मी, चेन्नई (६.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक