नवीन शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात आधुनिक शिक्षणासह पारंपरिक शिक्षणाची जोड !
छत्रपती संभाजीनगर – भारत सरकारने पतंजलि समुहाच्या माध्यमातून भारतीय शिक्षा बोर्डाला अनुमती दिली आहे. यात भारतीय संस्कृतीविषयी अभ्यासक्रम मुलांना शिकवला जाणार आहे. पहिली ते बारावी या वर्गांमध्ये आधुनिक शिक्षणासह पारंपरिक शिक्षणाची जोड या निमित्ताने दिली जाणार असून याविषयी सर्व शाळांसमवेत बैठक घेऊन पुढील वर्षी अभ्यासक्रम अमलात आणला जाणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात देशातील बहुतांश शाळांमध्ये अभ्यासक्रम चालू करण्यासाठी प्रयत्न चालू करण्यात आले आहेत. त्यासाठीची एक महत्त्वाची बैठक पुणे येथे नुकतीच पार पडली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतांना भारतीय शिक्षा बोर्ड कार्याध्यक्ष एन्.पी. सिंग म्हणाले, ‘‘जगात भारताची एक वेगळी संस्कृती पहायला मिळते. एकेकाळी गुरुकुल पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्राचीन शिक्षणपद्धती अंमलात आणली जायची. त्या काळात जगात भारत देश बुद्धीमत्ता आणि संस्कृती असलेला सर्वश्रेष्ठ मानला जायचा; मात्र हळूहळू पाश्चिमात्य संस्कृती देशात रुजू झाली. त्यामुळे काही प्रमाणात भारतीय संस्कृतीचा विसर पडायला लागला. त्यामुळेच भारत सरकारने भारतीय शिक्षा बोर्ड सिद्ध केला आहे.’’
या वेळी बोलतांना मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेव म्हणाले, ‘‘भारत हा संस्कृती जपणारा आदर्शवादी देश होता आणि याला तोडायचे तर याची शिक्षणपद्धती मोडकळीस आणली पाहिजे, असे मत वर्ष १८५३ मध्ये ब्रिटीश पार्लमेंट मध्ये लॉर्ड मेकॉलेने व्यक्त केले होते, तसेच गुरुकुल पद्धती उद्ध्वस्त करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला होता आणि आता ते होत आहे. त्यामुळेच पुढील वर्षापासून आधुनिक अभ्यासासह प्राचीन गणित, वैदिक गणित, प्राचीन विज्ञान यांसह संस्कृती दर्शवणारा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे.’’