मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – पुणे येथील कल्याणीनगर येथे १९ मे या दिवशी पहाटे २.३० वाजता झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी सकाळी ८.१३ वाजता गुन्हा नोंदवला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी यात सक्रियतेने कार्यवाही केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यवस्थित काम केले असल्याने त्यांचे स्थानांतर करण्याची मागणी करणे योग्य नाही. त्यांनी या प्रकरणाचे योग्य अन्वेषण केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना केली.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या घटनेत पुणे पोलीस आयुक्तांसह दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना विधान परिषदेत मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.
या घटनेसंदर्भात माहिती देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,…
१. अपघातप्रकरणी प्रारंभी ३०४ (अ) कलमाची नोंद करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता वरिष्ठ पोलीस अधिकारी आल्यानंतर त्यांनी यात पालट करून या कलमाऐवजी ३०४ कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. आरोपीचे वय १८ वर्षांहून अल्प असल्याने बाल न्यायालयासमोर प्रकरण नेण्यात आले. तेथेही ३०४ या कलमाचीच नोंद आहे.
२. या प्रकरणी आरोपीची तातडीने वैद्यकीय पडताळणी केली नसल्याविषयी पोलीस निरीक्षकांवर कारवाई केली असून पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सक्रियतेने कार्यवाही केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणी आरोपीचे रक्त नमुने पालटण्यात सहभागी असलेल्या आधुनिक वैद्यांवर, तसेच गुन्ह्याचा आरोप चालकाने घ्यावा; म्हणून त्यांना १ दिवस कोंडून ठेवून दबाव टाकल्याप्रकरणी आरोपीचे वडील आणि आजोबा यांच्यावरही गुन्हा नोंद केला आहे.
३. या घटनेनंतर पुणे येथील अनधिकृत पब आणि बार यांवर कारवाई करण्यात येत असून इतर पब आणि बार वेळेवर बंद होतात किंवा नाही, यावर देखरेखीसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. यासाठी नियमावली सिद्ध करण्यात येत आहे.