पुणे जिल्ह्यातील ३१७ गावांत स्मशानभूमीची आवश्यकता !

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलवडे यांची माहिती !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – जिल्ह्यामध्ये १ सहस्र ३८६ ग्रामपंचायती असून १ सहस्र ८४४ महसुली गावे आहेत. त्यापैकी ३१७ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना इतर जागांचा आधार घ्यावा लागत आहे. गावकर्‍यांकडून सतत स्मशानभूमीची मागणीही करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ३१७ गावांमध्ये स्मशानभूमीच्या निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) प्रस्ताव पाठवल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलवडे यांनी दिली.

नलवडे यांनी पुढे सांगितले की, अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहे, तर त्यावर शेडही नाही. स्मशानभूमी नसल्याने उघड्या जागेवर, नदीकाठावर अथवा रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात स्मशानभूमीची सर्वाधिक मागणी आहे. या तालुक्यात ५६ गावांमध्ये स्मशानभूमीची आवश्यकता आहे. त्या पाठोपाठ जुन्नर ३९, खेड ३८ ची मागणी आहे. यासाठी १ कोटी ७० लाख रुपये निधीची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका :

  • स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही प्रत्येक गावातील जनतेला स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधा न मिळणे हे संतापजनक !
  • एका जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये स्मशानभूमी नसणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !