मनुष्यजन्मातील चार ऋणांतून एकाच जन्मात मुक्त करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदु धर्मानुसार ‘मागील अनेक जन्मांतील पाप-पुण्याच्या कर्मांमुळे निर्माण झालेले प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि ईश्वरप्राप्ती करणे’, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे. मनुष्य जन्माला आल्यावर त्याला १. देवऋण, २. ऋषिऋण, ३. पितृऋण आणि ४. समाजऋण ही ४ ऋणे फेडावी लागतात. या ४ ऋणांतून मुक्त होण्याचा मार्ग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केवळ सनातन संस्थेच्या साधकांनाच नाही, तर अखिल मानवजातीला शिकवला आहे. त्याचे विवेचन येथे दिले आहे.

पू. अशोक पात्रीकर

१. देवऋण

१ अ. देवऋणातून मुक्त होण्यासाठी साधना करणे आवश्यक असणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समाजाला साधना शिकवून देवऋणातून मुक्त करणे

‘आपल्याला मनुष्यजन्म मिळाला असून मनुष्याची अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा ही सर्व काळजी देव घेतो. त्यासाठी देवाच्या प्रती कृतज्ञता म्हणून देवऋण फेडायचे असतात. पूर्वीच्या काळी समाज होम, हवन आणि यज्ञयाग या माध्यमांतून साधना करून या ऋणांतून मुक्त होत असे. कलियुगासाठी ‘देवतांचा नामजप करणे’ ही सर्वश्रेष्ठ आणि अतिशय सुलभ अशी साधना आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संग आणि ग्रंथ यांच्या माध्यमांतून साधक, जिज्ञासू अन् धर्मप्रेमी यांना ‘कुलदेवता’ आणि ‘दत्त’ या देवतांच्या नामजपाचे महत्त्व सांगून त्यांना साधनेकडे वळवले आहे. ते त्यांच्याकडून साधना करूनही घेत आहेत. आज सहस्रो साधक आणि धर्मप्रेमी नामजप करून साधनेत प्रगती करून आनंद अनुभवत आहेत. साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यात नेण्यासाठी गुरुदेवांनी साधकांकडून विविध देवतांचे नामजप करून घेऊन साधकांना निर्गुण तत्त्वापर्यंत पोचवले आहे. त्यामुळे जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक देवऋणातून मुक्त होत आहेत.

२. ऋषिऋण

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी धर्मग्रंथांतील ज्ञान सोप्या भाषेत वेगवेगळे ग्रंथ लिहून ते समाजापर्यंत पोचवणे !

‘आपल्या ऋषिमुनींनी आपल्यासाठी धर्मग्रंथ लिहून ठेवले आहेत. ते त्यांनी आपल्यावर केलेले मोठेच ऋण आहेत. या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी लिहून ठेवलेल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून ते ज्ञान समाजापर्यंत पोचवले, तर आपण या ऋणातून मुक्त होऊ शकतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आपले प्रमुख धर्मग्रंथ असलेले वेद, उपनिषदे, योगवाशिष्ठ, पुराणे, गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, दासबोध, या ग्रंथांमध्ये असलेले धर्म, अध्यात्म, धर्माचरण, सण, व्रते इत्यादी विषयांचे ज्ञान वेगवेगळ्या ग्रंथात सोप्या भाषेत लिहून ते ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांनी ते ग्रंथ विविध भाषांत भाषांतरित करून घेऊन त्यांचे ३०० हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

२ आ. सत्संगांच्या माध्यमातून सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान समाजापर्यंत पोचवायला सांगून साधकांना ऋषीऋणातून मुक्त करणे

गुरुदेव अजूनही अविरतपणे ऋषींनी लिहिलेले ज्ञान सोप्या भाषेत वेगवेगळे ग्रंथ लिहून ते समाजापर्यंत पोचवण्याची निष्काम सेवा करत आहेत. त्यांना ग्रंथांतील अधिकाधिक ज्ञान आपत्काळापूर्वी समाजापर्यंत पोचवण्याची तळमळ लागली आहे. ते ज्ञान सत्संगांच्या माध्यमातून सामान्य जनतेला (हिंदूंना) सांगण्याचे कार्य आज साधना म्हणून साधक आणि अनेक धर्मप्रेमी करत आहेत. या माध्यमांतून साधक आणि धर्मप्रेमी ऋषीऋणातून मुक्त होत आहेत.

३. पितृऋण

३ अ. ज्येष्ठांची सेवा-सुश्रुषा करून आणि त्यांनी इहलोक सोडल्यावर त्यांचे श्राद्ध-पक्ष करून पितृऋणातून मुक्त होता येणे

पितरांनी आपल्यासाठी पुष्कळ काही केलेले असते. त्यामुळे त्यांचे आपल्यावर ऋण असते. ते फेडण्यासाठी त्यांची सेवा-सुश्रुषा करून आणि ‘इहलोक सोडून गेलेल्या पितरांना पुढील गती मिळावी’, यासाठी त्यांचे श्राद्ध-पक्ष करून हे ऋण मनुष्याला फेडता येते. पूर्वीच्या काळी समाज पितरांसाठी श्रद्धेने श्राद्ध-पक्ष करायचा. आताचा समाज हे करत नाही. त्याला पर्याय म्हणून कठोर साधना केली, तरच हे ऋण फिटू शकते; पण समाज पूर्वजांची छायाचित्रे घरात लावून आणि त्यांच्या नावे दानधर्म करून हे ऋण फेडायचा प्रयत्न करतो; पण एवढ्याने त्यांना सद्गती मिळत नाही. त्यामुळे समाजातील बहुसंख्य जणांना अतृप्त पितरांमुळे होणारे त्रास भोगावे लागतात.

३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी दत्ताचा नामजप आणि श्राद्ध-पक्ष इत्यादी विधींचे महत्त्व सांगणे

पूर्वजांना पुढची गती देणारी देवता असलेल्या दत्तगुरूंचा नामजप करून पितृऋणातून मुक्त होता येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक आणि समाज यांना हे शास्त्र सुलभ भाषेत सांगितले. त्यामुळे समाज आणि अनेक साधक या ऋणांतून मुक्त होत आहेत.

४. समाजऋण

४ अ. मनुष्य समाजात रहाणारा प्राणी असून त्याला जगण्यासाठी अनेकांचे साहाय्य आवश्यक असणे

मनुष्य समाजात रहातो. मनुष्याला दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार्‍या अनेक गोष्टींसाठी तो समाजातील लोकांवर अवलंबून असतो. समाजातील काही जण धान्य पिकवतात, काही जण कापसापासून वस्त्रनिर्मिती करतात, तर काही जण दैनंदिन लागणार्‍या वस्तू उपलब्ध करून देतात. मनुष्य एकटा या सर्व गोष्टी करू शकत नाही; म्हणून या समाजांची त्याच्यावर ऋणे असतात.

४ आ. समाजऋण फेडण्यासाठी साधना शिकवणे योग्य असणे

समाजाचे हे ऋण फेडण्यासाठी कुणी भिकारी किंवा गरिब यांना दान देतात, कुणी गावात शाळा बांधून देतात, कुणी पिण्याच्या पाण्याची सोय करतात. या गोष्टी करणे अयोग्य नाही; पण व्यक्ती किंवा गाव यांच्या प्रारब्धांमागील कार्यकारणभाव मनुष्याला ठाऊक नसल्यामुळे मनुष्य असे वरवरचे प्रयत्न करतो; पण सर्वज्ञ, सर्वज्ञानी आणि सर्वव्यापी ईश्वर अशा गोष्टींकडे साक्षीभावाने पहातो; कारण ज्याचे त्याचे प्रारब्ध ज्याचे त्यालाच फेडायचे असते. ती व्यक्ती किंवा ते गाव यांच्या प्रारब्धानुसार सर्व घडत असते. हे प्रारब्ध भोगण्याची शक्ती साधनेमुळेच मिळते आणि प्रारब्ध न्यून करण्यासाठीही साधनाच करावी लागते; म्हणून समाजाला साधना शिकवून समाजऋणातून खर्‍या अर्थाने मुक्त होता येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अनेक साधक आणि धर्मप्रेमी समाजाला साधनेकडे वळवत असून समाजऋणातून मुक्त होत आहेत.

अशा रितीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधक आणि समाज यांना या एकाच मनुष्यजन्मात चारही ऋणांतून मुक्त करत आहेत. त्यामुळे मनुष्यजन्माचे सार्थक होत आहे. याच जन्मात चारही ऋणांतून मुक्त करणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुमाऊलीने सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या पवित्र चरणांवर कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’

– पू. अशोक पात्रीकर (सनातनचे  ४२ वे (समष्टी) संत), अकोला (१४.५.२०२४)