मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – राज्यघटनेमध्ये धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचे प्रावधान नाही. मुसलमान समाजामध्ये कुणी मागास असतील, तर त्यांना मागासवर्गियांसाठी असलेल्या आरक्षणातून लाभ घेता येतो; पण मुसलमान म्हणून धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही.
मतांच्या राजकारणामध्ये धर्म आणू नका. आपण सर्व भारतमातेचे सुपुत्र आहोत, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मुसलमानांना धर्माच्या आधारे आरक्षण देण्याविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ११ जुलै या दिवशी माहिती सूत्राच्या अंतर्गत विधानसभेत मुसलमानांना आरक्षण प्राप्त झाले नसल्याचा विषय उपस्थित केला. मुसलमानांना सरकारने लवकरात लवकर आरक्षण घोषित करावे, अशी मागणी आझमी यांनी केली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी वरील उत्तर दिले.