६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा मंजुनाथ यांचा रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांच्या चरणांवरील फुलांशी झालेला संवाद आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

१. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांच्या चरणांवरील फुलांशी झालेला संवाद

ध्यानमंदिरातील नवीन रचना

‘मी रामनाथी आश्रमात असतांना २६.२.२०२२ या दिवशी तेथील ध्यानमंदिरात जप करत होते. अचानक माझे लक्ष प.पू. भक्तराज महाराज आणि अष्टदेवता यांच्या चरणांजवळील फुलांकडे गेले अन् माझी भावजागृती झाली. ती फुले आनंदाने हसत होती. तेव्हा मी त्या फुलांकडे पाहून त्यांच्याशी बोलू लागले.

सौ. राधा मंजुनाथ

१ अ. गुरुचरण आणि देवता यांच्या चरणांजवळ येण्यासाठी फुलांनी केलेले प्रयत्न

सौ. राधा : तुम्ही गुरूंच्या आणि देवतांच्या चरणांजवळ येण्यासाठी काय प्रयत्न केला ? मी फार अल्प पडत आहे. माझ्यात पुष्कळ स्वभावदोष आणि अहं आहे. ‘कसे प्रयत्न करायचे ?’, हेही मला कळत नाही.

फुले : आम्ही या चैतन्यमय वातावरणात आलो आहे. गुरुदेवच येथे आम्हाला घेऊन आले आहेत. आम्हाला केवळ अन् केवळ गुरुचरणांजवळ जाण्याची तीव्र तळमळ होती. त्यासाठी आमचे प्रयत्न होते.

१ आ. गुरुचरणांजवळ जाण्याच्या तीव्र तळमळीने फुलांनी केलेले प्रयत्न

सौ. राधा : मग त्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न केले ?

फुले : आम्ही पुढीलप्रमाणे प्रयत्न केले.

१. आमच्याकडे सत्संग चालू केला. सत्संग ऐकतांना आमच्याकडून नामजप होत होता. हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने चांगले चालत असतांना अनिष्ट शक्तींनी आम्हाला त्रास देण्यास आरंभ केला, उदा. जोराचा वारा, वादळ, पाऊस येणे. जोराचा वारा आणि पाऊस यांमुळे काही कळ्या अन् फुले गळून पडायची.

२. उन्हाच्या झळीने फुले आणि कळ्या सुकून जायच्या अन् पाणी अल्प झाल्यामुळे झाडे, फुले वाळून जायची. तेव्हा असा प्रसंग येऊ नये; म्हणून आम्ही गुरुदेवांना शरण जात होतो. आम्ही प्रार्थना आणि नामजप अधिक प्रमाणात करू लागलो. जेव्हा आश्रमात संत नामजपाला बसतात, तेव्हा आम्हालाही आध्यात्मिक लाभ होत होते.

३. साधक झाडांना पाणी घालतांना ‘गुरुदेवांच्या चरणांवरील तीर्थच आमच्यावर पडत आहे’, असा आम्ही भाव ठेवला.

४. आम्ही फुलल्यानंतर देवाजवळ जाणार; म्हणून काही वेळा अनिष्ट शक्ती आम्हाला नष्ट करायच्या.

५. आम्ही गुरुचरणांजवळ जाण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करत होतो. सूर्यदेव कधी उगवेल, याची आर्ततेने वाटच पहात होतो.

६. सकाळी साधक आम्हाला घेऊन जाण्यासाठी छान टोपली घेऊन येतात. नेहमीप्रमाणे आजही ते नामजप करत आले आणि आम्हाला देव अन् गुरुदेव यांच्या चरणी घेऊन आले. गुरुदेव आणि देवता यांच्या चरणांजवळ आल्यानंतर साधक अन् गुरुदेव यांच्या चरणी आम्ही पुष्कळ कृतज्ञता व्यक्त केली.

१ इ. फुले मनाने आनंदी असणे

सौ. राधा : तुम्ही संध्याकाळपर्यंत सुकून जाता ना ?

फुले : हो. आमचे शरीर कोमजले, तरी आम्ही मनाने फार आनंदी असतो. गुरुदेवांच्या चरणी समर्पित झाल्यावर या शरिराचा काय उपयोग ? आमचे मन आनंदी आहे. आम्हाला गुरुचरणी लीन झाल्याचा आनंद मिळत आहे.

२. तळमळीने आणि चिकाटीने साधना करून ईश्वरचरणी एकरूप होणे आवश्यक असल्याचे फुलांकडून शिकायला मिळणे

१. फुले माझ्याशी वरीलप्रमाणे बोलल्यावर ‘केवळ १ दिवसाचे आयुष्य असणारी फुले किती आनंदी असतात ! त्यांना गुरुदेवांच्या चरणी जाण्याची ओढ किती आहे !’, हे माझ्या लक्षात आले.

२. देवाने आम्हाला फुलांच्या तुलनेत पुष्कळ वर्षे आयुष्य देऊनही आम्ही त्यांतील अनेक वर्षे वाया घालवतो. ‘या फुलांप्रमाणे आपणही तळमळीने आणि चिकाटीने साधना करण्याचे प्रयत्न करून ईश्वरचरणी एकरूप झाले पाहिजे.’

३. प्रार्थना आणि कृृृतज्ञता

‘हे परब्रह्म विष्णुस्वरूप गुरुमाऊली, जसे या फुलांना तुम्ही तुमच्या चरणांजवळ घेतले आहे, तसे या जिवालाही तुमच्या चरणांजवळ घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. गुरुदेवा, या फुलांकडून शिकण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. राधा मंजुनाथ, मंगळुरू, कर्नाटक.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.