सर्वांवर आईप्रमाणे माया करणार्‍या आणि श्रीकृष्णाप्रती भाव असणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. सुनीती अनंत आठवले (वय ७९ वर्षे) !

‘सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले (पू. भाऊकाका, वय ८८ वर्षे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जेष्ठ बंधू) यांच्याकडे सेवेला गेल्यावर आरंभीच्या काळात मला सेवेतील काही भाग लक्षात येत नसे. त्या वेळी आठवलेकाकूंनी (सौ. सुनीती अनंत आठवले यांनी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वहिनी) मला प्रत्येक भाग नीट समजावून सांगितला. ‘प्रत्येक सेवा परिपूर्ण व्हावी’, यासाठी त्या मला साहाय्य करतात. सौ. सुनीती अनंत आठवले यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. अनंत आठवले आणि सौ. सुनीती आठवले

१. आईच्या मायेने शिकवणे

पू. भाऊकाकांकडे सेवेसाठी गेल्यावर सौ. आठवलेकाकूंनी मला सेवा आणि त्यातील बारकावे प्रेमाने शिकवले, उदा. कपडे कसे धुवायचे ? कपडे वाळत घालतांना ते नीट वाळत कसे घालायचे ? कपडे दोरीवर वाळत घालतांना पहिल्या दोरीवर कोणत्या कपड्यांना प्राधान्य द्यायचे आणि नंतर उरलेल्या दोरीवर कोणते कपडे घालायचे. तसेच कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या ? भांडी धुऊन झाल्यावर ती कशी वाळत ठेवायची ? चहा करतांना त्याचे प्रमाण आणि चहा कितपत उकळवायचा. काकूंनी अशा अनेक गोष्टींमधील बारकावे मला शिकवले. अगदी आई जशी प्रेमाने सांगते, तसे प्रेम करून त्या मला प्रत्येक गोष्ट शिकवतात.

‘पू. भाऊकाका आणि सौ. सुनीती आठवले यांचे प्रेम पाहून ते आई-बाबाच आहेत’, असे वाटणे

‘एकदा माझी प्रकृती ठीक नसल्याने माझ्या चेहर्‍यावर थकवा दिसत होता. काकूंनी (सौ. सुनीती अनंत आठवले यांनी) मला विचारले, ‘‘वैदेही, काय झाले ? तुझा चेहरा थकलेला दिसतोय. तुला बरे नाही का ?’’ मी  म्हणाले, ‘‘बरे आहे’’; परंतु माझ्या चेहर्‍याकडे पाहून त्यांच्या ते लक्षात आले होते. त्या दिवशी काकूंनी आणि पू. भाऊकाकांनी मला अधिक सेवा करू दिल्या नाहीत. ते दोघेही मला म्हणत होते, ‘‘तू अधिक सेवा करू नकोस, आजारी आहेस ना ! अधिक सेवा केलीस, तर अजून आजारी पडशील.’’ त्यांचे हे प्रेम पाहून मला ते ‘माझे आई-बाबाच आहेत’, असे वाटले.’

– कु. वैदेही गजानन खडसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२४)

२. इतरांना समजून घेऊन त्यांना साहाय्य करणे

भांडी घासतांना काही वेळेला माझ्याकडून भांडी पडतात. त्या वेळी काकू मला सहज म्हणतात, ‘‘वैदेही, काय होत आहे ? काही अडचण आहे का ? मी साहाय्याला येऊ का ?’’ त्या वेळी चिडचिड न करता त्या मला समजून घेऊन साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा सेवा अधिक असल्याने मला रात्री सेवा आवरून जाण्यासाठी उशीर होतो; म्हणून मी घाई केल्यावर काकू म्हणतात, ‘‘वैदेही, मी आहे ना ! आपण दोघी करूया, म्हणजे सर्व लवकर होईल.’’ असे म्हणून त्या मला साहाय्य करतात.

कु. वैदेही खडसे

३. काटकसरीपणा

सौ. आठवलेकाकू ‘प्रत्येक गोष्ट जपून कशी वापरायची ?’, हे मला नेहमी सांगतात. एखादी वस्तू टाकून देण्यापूर्वी ती खरंच टाकण्यासारखी आहे का, हे त्या पहातात आणि मगच ती वस्तू टाकून देतात. ‘एखाद्या वस्तूतून नवीन काही सिद्ध करता येईल का ?’, याचा त्या विचार करतात.

४. इतरांचा विचार करणे

एकदा मी सेवा करून निवासस्थानी जाण्यासाठी बसची वाट पहात थांबले होते. त्या वेळी २-३ श्वान माझ्या आजूबाजूला येऊन थांबले होते. दुसर्‍या दिवशी हे मी काकूंना सांगितल्यावर त्यांनी मला त्यावर उपाययोजना सांगितली की, तू डब्याची पिशवी (पू. भाऊकाका आणि काकू यांच्यासाठी जेवणाचा डबा आणण्याची पिशवी) घेऊन जाऊ नको. त्या पिशवीला येणार्‍या वासामुळे ते श्वान तुझ्याजवळ येतात. ती पिशवी पाठवण्याची दुसरी व्यवस्था मी करते. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी काकूंनी अन्य साधकाकडे ती पिशवी दिली. तेव्हा ते श्वान माझ्याजवळ येणे बंद झाले.

५. चूक सुधारण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करणे

एक दिवस हात पुसण्यासाठी वापरायचे कापड काकूंनी सज्जात वाळत घातले होते. ते वार्‍याने उडून खाली पडले. मी काकूंना कापड दिसत नसल्याचे सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘ते खाली पडले असेल. मी घेऊन येते.’’ मी म्हटले, ‘‘काकू, तुम्ही नको, मी घेऊन येते.’’ त्यावर काकू म्हणाल्या, ‘‘मी केलेली चूक मीच सुधारायला पाहिजे ना ? मीच ते कापड आणणार.’’

६. सौ. सुनीती आठवले यांचा श्रीकृष्णाप्रती असलेला भाव !

सौ. आठवलेकाकू प्रत्येक कृती श्रीकृष्णासाठी करतात. त्या नेहमी श्रीकृष्णाला हाक मारतात. एखादी कृती होत नसल्यास त्या श्रीकृष्णाला सांगतात, ‘कृष्णा, मला साहाय्य कर ना रे !’, असे त्यांनी श्रीकृष्णाला सांगितल्यावर ती कृती आपोआप पूर्ण होते.

‘भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पू. भाऊकाका आणि काकू यांच्याकडे सेवेला जाण्याची संधी मिळते. मला त्यांच्याकडून पुष्कळ गोष्टी शिकता आल्या’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. वैदेही गजानन खडसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२४)