हिंदूंच्‍या आक्रमक भूमिकेमुळे गोवंश हत्‍येच्‍या प्रकरणी संशयिताला अटक आणि पोलीस कोठडी

गोवंशाचे शिर रस्‍त्‍यात आढळल्‍याने रत्नागिरीत सकल हिंदु समाजाचा भव्‍य मोर्चा

सकल हिंदु समाजाचा रत्नागिरीत निघालेला प्रचंड मोर्चा

रत्नागिरी – गोवंश हत्‍येप्रकरणी आरोपींना केव्‍हा अटक करणार ?, या मुख्‍य मागणीसाठी ७ जुलैला रत्नागिरी शहरात सकल हिंदु समाजाने पोलीस कार्यालयावर भव्‍य मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्‍यानंतर हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या प्रश्‍नांना जिल्‍हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्‍याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्‍याने शेवटी सकल हिंदु समाजाने रस्‍ता रोखला. ‘जोपर्यंत आरोपी अटक करून न्‍यायालयात नेणार नाहीत. तोपर्यंत रस्‍त्‍यावरून हटणार नाही’, अशी भूमिका घेतल्‍याने पोलिसांनी शेवटी संशयिताला न्‍यायालयात उपस्‍थित केले. संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्‍यात आली.

वारंवार घडणार्‍या गोहत्‍यांमुळे हिंदू संतप्‍त !

शहरातील एम्.आय.डी.सी. भागात सापडलेल्‍या वासराच्‍या शिरावरून हिंदु बांधव संतप्‍त झाले आहेत. गोहत्‍येच्‍या अनेक घटना वारंवार घडत असतांनाही पोलीस प्रशासन त्‍याकडे दुर्लक्ष करत आहे. या पार्श्‍वभूमीवर २ दिवसांपूवी झालेल्‍या घटनेनंतर संबंधित आरोपीला पकडण्‍यासाठी नागरिकांनी पोलिसांना ४८ घंट्यांची मुदत दिली होती. ही मुदत ६ जुलै या दिवशी संपल्‍यावर सकल हिंदु समाजाच्‍या वतीने ७ जुलै या दिवशी भव्‍य मोर्चा काढण्‍यात आला. या मोर्चामध्‍ये सहस्रोंच्‍या संख्‍येने हिंदु बांधव सहभागी झाले होते.

पोलीस अधीक्षकांसमोर मांडले रोखठोक प्रश्‍न !

मारुती मंदिर येथून चालू झालेला मोर्चा ‘जेल रोड’ येथे जाताच पोलिसांनी त्‍याला अडवले. पोलिसांनी मोर्चा अडवल्‍यावर माजी खासदार नीलेश राणे जिल्‍हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्‍याजवळ हिंदूंच्‍या मागण्‍या मांडल्‍या.

४८ घंट्यांची दिलेल्‍या मुदतीत आपण काय केलेत ? आजवर अनेक वेळा काही ठराविक लोकांना तुम्‍ही पाठीशी घालत आहात. केवळ आम्‍हाला रात्री येऊन नोटिसा का देता ? आरोपी पकडल्‍यास त्‍याला ‘मोका कायदा’ लावून गुन्‍हा नोंदवा. आम्‍हाला न्‍यायाची अपेक्षा आहे. त्‍याचबरोबर येथील  कोकण नगर आणि अन्‍य ठिकाणचे पशूवधगृहे उद़्‍ध्‍वस्‍त करा, अशा मागण्‍या केल्‍यानंतर जिल्‍हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सीसीटीव्‍हीच्‍या माध्‍यमातून अजून तपास चालू आहे. कुणाला पाठीशी घालण्‍याचा प्रश्‍न नाही. काल आम्‍ही एका व्‍यक्‍तीला ताब्‍यात घेतले होते. त्‍याचा तपास चालू आहे.

हिंदूंच्‍या निर्धारासमोर पोलीस झुकले !

हिंदुत्‍वनिष्‍ठांना अपेक्षित उत्तरे न मिळाल्‍याने शेवटी ‘कोणत्‍याही परिस्‍थितीत संशयिताला न्‍यायालयात उपस्‍थित करा अन्‍यथा आम्‍ही येथून हलणार नाही’, अशी भूमिका घेत हिंदु बांधवांनी रस्‍त्‍यात ठाण मांडली. हिंदु  समाजाच्‍या निर्धारासमोर शेवटी पोलिसांनी माघार घेत अटक केलेल्‍या संशयित आरोपीला न्‍यायालयात नेऊन ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. याची माहिती  आंदोलनकर्त्‍यांना मिळाल्‍यानंतर शेवटी हे आंदोलन थांबवण्‍यात आले. या वेळी पडलेल्‍या मुसळधार पावसातही आंदोलनकर्ते मागे हटले नाहीत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनो, तुम्‍ही संघटित झाल्‍यास त्‍याचा परिणाम काय होतो, हे लक्षात घ्‍या !
  • गोहत्‍या बंदी कायदा असतांना त्‍याचा उपयोग होण्‍यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद !