‘सनातनचे १०१ वे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले (पू. भाऊकाका, वय ८८ वर्षे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांच्या समवेत सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. साधिकेला तिच्या न्यून पडणार्या सेवेच्या गतीविषयी प्रेमाने समजावून सांगणारे पू. अनंत आठवले !
‘आरंभी संगणकावर मराठी टंकलेखन करतांना माझी गती पुष्कळ न्यून होती. त्यामुळे पू. भाऊकाकांना मला एकेक शब्द सांगून थांबावे लागत असे. यात त्यांचा पुष्कळ वेळ वाया जात असूनही ते शांत असायचे. त्यामुळे माझे मन निराश झाले होते. त्या वेळी पू. काका मला म्हणाले, ‘‘तुम्ही आता शिकत आहात. त्यामुळे वेळ लागत आहे. थोड्या दिवसांत तुम्हाला छान जमेल.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून मला आनंद झाला आणि मी जोमाने प्रयत्न करू लागले. या प्रसंगात ‘पू. भाऊकाकांमध्ये पुष्कळ संयम आहे’, हे मला शिकायला मिळाले.
२. पू. भाऊकाकांच्या बोलण्यामुळे साधिकेला नकारात्मक विचारातून बाहेर पडता येणे
माझ्या मनात सेवा किंवा चुका यांचे विचार वाढतात. त्या वेळी पू. काका अकस्मात् येऊन असे काही बोलतात की, माझे मन नकारात्मक विचारातून बाहेर पडते. त्यामुळे मी वर्तमानस्थितीत येते आणि माझे लक्ष मी करत असलेल्या कृतीकडे केंद्रित होते.
३. साधिका सेवा करत असतांनाही तिचे मन सूक्ष्मातून जाणणारे पू. अनंत आठवले !
माझी व्यष्टी साधना म्हणून मला गुरुपादुकांचे स्मरण वाढवण्यास सांगितले होते. एकदा मी आणि पू. भाऊकाका दुपारी नेहमीप्रमाणे संगणकीय सेवा करत होतो. संगणकावर मधेच ‘नामस्मृती’ येते. (‘सेवा करतांना प्रती १५ मिनिटांनी नामजप किंवा प्रार्थना यांची आठवण व्हावी’, यासाठी ‘नामस्मृती’ संगणकीय प्रणाली आहे.) तेव्हा मी काही वेळा डोळे बंद करून, तर काही वेळा डोळे उघडे ठेवून गुरुपादुकांचे स्मरण करत होते. त्याच वेळी मी पू. भाऊकाका जे सांगत होते, ते टंकलेखनही करत होते. तेव्हा पू. भाऊकाका मला म्हणाले, ‘‘आज तुमचे लक्ष दोन्हीकडेही आहे. तुमच्या परम पूज्यांकडे आणि संगणकावर टंकलेखन करण्याकडेही लक्ष आहे. छान आहे.’’
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा वाढवण्यास शिकवणारे पू. भाऊकाका !
एक दिवस पू. भाऊकाकांकडील सेवा पूर्ण करून मी बसने घरी जाण्यास निघाले. तेव्हा पू. भाऊकाका मला म्हणाले, ‘‘तुम्हाला बसने जातांना भीती वाटत नाही का ?’’ मी काही उत्तर देण्याच्या आधीच ते पुन्हा मला म्हणाले, ‘‘तुम्हाला भीती कशी वाटेल ! तुमचे परम पूज्य नेहमी तुमच्या समवेतच असतात ना !’’ हे वाक्य ऐकून मला वाटले की, ‘परम पूज्य माझ्या समवेत आहेत’, ही जाणीव माझ्यात वाढावी’, यासाठीच ते मला असे म्हणाले आहेत.’
– कु. वैदेही गजानन खडसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |